(Photo - X)
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना भारतीय जनता पक्षाने आतापासूनच निवडणूक तयारीला वेग दिला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामासोबतच मतदार नोंदणी आणि सोशल मीडिया प्रचारावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या.
नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा या भागांत सुमारे १२ लाख पदवीधर मतदार असल्याचा अंदाज व्यक्त करत, त्यापैकी किमान ५० हजार नव्या पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेण्याचे लक्ष्य चव्हाण यांनी दिले. आगामी निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरमधील एअरपोर्ट बँक्वेट हॉल येथे झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडिया वापराबाबतही कानपिचक्या दिल्या. भाजपचे बहुतांश कार्यकर्ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचे सांगत, केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय, विविध योजना आणि विकासकामांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाच्या पोस्ट शेअर न करता स्थानिक पातळीवरील कामे आणि सरकारच्या योजनांची माहिती स्वतःच्या नावाने नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींनाही चव्हाण यांनी महत्त्व दिले. नागरिकांच्या समस्या ऐकणे आवश्यक आहेच; मात्र त्याचबरोबर सरकारची कामे आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘व्होकल’ होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी संघटनात्मक पातळीवर कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रदेशाध्यक्षांनी पूर्व विदर्भात सलग बैठका घेतल्या आहेत.
चव्हाण यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या विकासकामांचा प्रचार करण्याचे निर्देश दिले. वीजपुरवठा, उद्योग, जीएसटी, दुष्काळ निवारण आणि विकसित भारताच्या संकल्पनेशी संबंधित योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला.
या बैठकीला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, परिणय फुके, नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक ताकद आणि मतदार नोंदणीला प्राधान्य दिल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

