‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या धामधुमीचे वातावरण असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोजच खडाजंगी होत असल्याचे चित्र आहे. राजनेत्यांकडून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय भूमिकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते आणि त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची अट ठेवली होती, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, ते मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. मुंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी केंद्रात मंत्रिपद देण्याची अट ठेवली होती. मंत्रिपद न मिळाल्यास नागपूरमधील दोन नेते आपल्याला निवडून येऊ देणार नाहीत, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली होती, असा दावा चव्हाण यांनी केला.
मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पक्षाच्या तत्कालीन नेतृत्वाशी चर्चा झाल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी या प्रवेशाला सकारात्मकता दर्शवली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातील खासदाराला काँग्रेसमध्ये घेऊन त्याला मंत्री करण्यास नकार दिल्याने हा प्रवेश प्रत्यक्षात होऊ शकला नाही, असा दावा त्यांनी केला.
Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
या प्रकरणात आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी थेट चर्चा करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्याकडे गेलो, याचा आता पश्चात्ताप होत असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. सरकार सध्या ‘पॅनिक’ परिस्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीबाबत सत्ताधाऱ्यांना खात्री नसल्याने राजकीय पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
डीलिमिटेशनच्या प्रस्तावावरही चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. दक्षिण भारतातील राज्यांनी गेल्या काही दशकांत मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची फेररचना झाल्यास प्रादेशिक समतोल बिघडण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
डीलिमिटेशनच्या मुद्द्यावर शरद पवार गटाकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे नाव केंद्रीय शिक्षणमंत्री पदासाठी चर्चेत असल्याचा उल्लेख करत देशाला सक्षम शिक्षणमंत्री मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. योग्य व्यक्ती आपल्या पक्षात नसेल तर इतर पक्षातूनही ती व्यक्ती घ्यावी, असा टोला त्यांनी लगावला.

