photo Credit- Social Media
झारखंड : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांन आज (8 जुलै) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ४५ मते पडली, तर विरोधात शून्य मते पडली. मतदानादरम्यान भाजप आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला.
मतदानापूर्वी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देताना हेमंत सोरेन यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत केंद्रीय संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तर हेमंत सोरेन यांच्या भाषणादरम्यान भाजप आमदारांनीही गोंधळ घालण्यास सुरूवात केली
त्यावेळी हेमंत सोरेन म्हणाले, “त्यांच्याकडे ना विचार आहे ना अजेंडा. त्यांच्याकडे केंद्रीय संस्था आहेत. निम्मे आमदारही एकत्र आले तर मोठी गोष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत आपला चेहरा दाखवला, आता राज्याच्या निवडणुका होणार आहेत. त्या महाआघाडीसोबत एकत्रितरित्या लढणार आहोत. या निवडणुकीत आम्ही त्यांना आरसा दाखवू. त्यांचे हे कारस्थान काही चालणार नाही.
सोरेन म्हणाले, “मी कायदेशीर प्रक्रियेतून येथे आलो आहे. मग मला या भूमिकेत पाहून विरोधकांना कसं वाटत आहे हे त्यांच्या वागण्यातून दिसून येते आहे. ते फक्त राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
याचवेळी त्यांनी चंपाई सोरेन यांचेही आभार मानले. हेमंत सोरेन तुरुंगात असताना त्यांनी चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार सोपवला होता. चंपाई सोरेन यांचे आभार मानत हेमंत सोरेन म्हणाले, मी भाजपचे लोक घोडे बाजार करत होते. पण चंपाई सोरेन यांनी ज्या प्रकारे सरकार चालवले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अशा शंब्दात त्यांनी चंपाई सोरेन यांचे कौतुकही केले.
दरम्यान, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांना 28 जून रोजी झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला. हेमंत सोरेन यांना ईडीने 31 जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीच्या कोठडीत असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा पदभार देण्यात आला.
झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभेत सध्या 76 आमदार आहेत. हेमंत सोरेन यांनी 3 जुलै रोजी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यानंतर सत्ताधारी JMM-काँग्रेस-RJD आघाडीने 44 आमदारांची समर्थन यादी राज्यपालांना सादर केली.