BJP MP Suresh Gopi : लोकसभेच्या निकालानंतर एनडीएला मिळालेल्या बहुमताच्या जोरावर भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला होता. काल पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेत नवा विक्रम नावावर केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री, तसेच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये त्यांच्याबरोबर एकूण ७२ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केरळमधील भाजपाचे पहिले आणि एकमेव खासदार सुरेश गोपी यांचादेखील समावेश आहे.
पक्षाकडे मंत्रीपद मागितलं नव्हतं
केरळचे एकमेव खासदार असलेले सुरेश गोपी यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आता ते मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. शपथविधी समारंभानंतर सुरेश गोपी यांनी नवी दिल्लीत एका मल्याळम वृत्तवाहिनीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी मोदींकडे किंवा पक्षाकडे मंत्रीपद मागितलं नव्हतं. मला माझ्या मतदारसंघात काम करायचं आहे, त्याचबरोबर माझे अपूर्ण राहिलेले चित्रपट मला साईन करायचे आहेत. मला आशा आहे की, ते लोक (एनडीए) लवकरच मला पदमुक्त करतील.
त्रिशूरचा खासदार म्हणून काम करण्याची इच्छा
यावेळी सुरेश गोपी यांना मंत्रीपद सोडण्याचं कारण विचारल्यावर ते म्हणाले, “मी काही चित्रपट साईन केले आहेत आणि मला ते करायचे आहेत. मी माझा मतदारसंघ त्रिशूरचा खासदार म्हणून काम करत राहणार आहे.” सुरेश गोपी हे त्रिशूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते केरळमधील भाजपाचे पहिले खासदार आहेत. त्रिशूरमध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा ७४,६८६ मतांनी पराभव केला आहे.
मतदारसंघासाठी मी काम करत राहीन
सुरेश गोपी यांनी आपली प्राथमिकता मतदारसंघात काम करण्याची असून, “मला केवळ खासदार म्हणून काम करीत राहायचं आहे. मी त्यांच्याकडे (पक्षश्रेष्ठींकडे) काहीच मागितलं नव्हतं. मी त्यांना म्हटलं होतं की मला या पदाची आवश्यकता नाही. मला वाटतं की लवकरच पदमुक्त होईन. मात्र त्रिशूरमधील मतदारांचं मी नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्यासाठी आणि मतदारसंघासाठी मी काम करत राहीन. माझ्या मतदारांनाही याची कल्पना आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करेन आणि त्यांनाही याची कल्पना आहे. म्हणूनच तर त्यांनी मला त्यांची मौल्यवान मतं दिली आहेत. मात्र मला मंत्रीपद सांभाळता येणार नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत मला माझे चित्रपट करायचे आहेत.”
चित्रपटांना प्राथमिकता
सुरेश गोपी हे मुळचे केरळमधील अलप्पुझा येथील रहिवासी आहेत. कोल्लम येथून त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यांनी बालवयापासूनच मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलियाट्टम या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून काही टीव्ही शो होस्ट करत आहेत. आता केंद्रीय मंत्रिपदापेक्षा त्यांनी चित्रपटांना प्राथमिकता दिली आहे.