फोटो सौजन्य - Social Media
गेल्या वर्षी १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दुर्घटनेत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले. प्रत्येक कुटुंबाने हे दुःख आपल्या पद्धतीने पेलण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमानातील केबिन क्रू सदस्य असलेल्या २२ वर्षीय इरफान शेख यांच्या कुटुंबाची वेदना आजही तशीच कायम आहे. मुलाच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी त्याचा मोबाईल नंबर आजही बंद केलेला नाही. दर महिन्याला त्याचा रिचार्ज करून ते त्याला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवत राहतात.
इरफान शेख यांच्या वडिलांनी सांगितले की, मुलगा आता या जगात नसला तरी त्याच्याशी संवाद साधण्याचा हा त्यांचा एकमेव मार्ग आहे. कुटुंबातील प्रत्येकजण आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी त्याला व्हॉट्सॲपवर लिहून पाठवतो. त्यांचा विश्वास आहे की, हे संदेश कुठेतरी त्याच्यापर्यंत पोहोचत असतील. मुलाचा मोबाईल नंबर सक्रिय राहावा म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्याचा रिचार्ज केला आहे.
भावुक झालेल्या इरफानच्या वडिलांनी सांगितले की, आजही मुलाच्या निधनाची वस्तुस्थिती स्वीकारणे त्यांच्यासाठी कठीण आहे. अपघातानंतर शवविच्छेदन कक्षात त्यांना मुलाच्या वस्तू एका बॉक्समध्ये देण्यात आल्या. त्यामध्ये त्याचे कपडे, बेल्ट, मोजे आणि इतर वस्तू सुरक्षित होत्या. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याचे शरीर पूर्णपणे जळाल्याचा उल्लेख असल्याने अनेक प्रश्न आजही त्यांच्या मनात कायम आहेत.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच नियंत्रणाबाहेर गेले आणि मेघानीनगर परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी एक वगळता सर्वांचा मृत्यू झाला. तसेच जमिनीवरील १९ जणांचाही या अपघातात जीव गेला. गेल्या दशकातील हा सर्वात भीषण विमान अपघात मानला जातो.
अपघाताला वर्ष पूर्ण झाले असले, तरी इरफान शेख यांच्या कुटुंबासाठी वेळ जणू थांबूनच गेला आहे. प्रत्येक व्हॉट्सॲप संदेशासोबत ते आपल्या मुलाच्या आठवणी पुन्हा एकदा जगतात. त्यांच्या या हळव्या कहाणीने अनेकांना भावूक केले असून, कोणत्याही आई-वडिलांवर अशी वेळ येऊ नये, अशी भावना व्यक्त केली जात आहे.






