नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बुधवारी दिल्ली हायकोर्टात न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायमूर्तीनी केजरीवाल यांची याचिका फेटाळली. या प्रकरणी आता 3 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.
या अटकेविरोधात उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने ईडीला २ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर साथीदारांनी कथित मद्य धोरण प्रकरणात 100 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
राजकीय हेतूनेच अटक
निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना झालेली अटक हा निष्पक्ष निवडणुकांना बाधा आणणारी कृती आहे. केजरीवालांना अटक करून निवडणूक प्रचार सहभागातून त्यांना हटविण्याचा हेतू आहे, असा युक्तिवाद केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.