चैन हिसकावली, कपडे फाडले; दिल्लीत काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटलं
देशाची राजधानी दिल्लीत कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आज घडलेल्या घटनेनंतर तर दिल्लीही सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेस पक्षाच्या खासदार सुधा रामकृष्णन मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या गळातील साखळी हिसकवण्यात आली. त्यामुळे दर खासदार आणि आमदार सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता माध्यमांशी बोलताना खासदार सुधा रामकृष्णन यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली. त्यांनी असा दावाही केला आहे की चोराने त्यांची साखळीच हिसकावली नाही तर त्यांचे कपडेही फाडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या घटनेबाबत त्या म्हणतात की, मी अजूनही धक्क्यात आहे, या देशात महिलांसाठी कोणतीही सुरक्षा नाही. मी सध्या एका सामान्य महिलेबद्दल विचार करत आहे, ती कुठे जाईल. यावेळी दिल्लीत एक महिला मुख्यमंत्री आहे, पण सुरक्षा व्यवस्था कुठे आहे, जर त्याने माझ्या मानेवर हल्ला केला असता तर मी तिथेच मरून गेले असते, असं त्या म्हणाल्या.
आरोपीने माझी साखळीच लुटली नाही तर त्याने माझे कपडेही फाडले. मी माझे कपडे व्यवस्थित करत होते. त्यामुळे मी साखळीबद्दल फारसा विचार केला नाही. आरोपीने लगेच0 घटनास्थळावरून पळ काढला. मी ओरडाओरडा केला, सगळे रस्त्यावर होते, पण कोणीही मला मदत केली नाही, हे ऐकून मला आणखी धक्का बसला. यानंतर, मी तामिळनाडू गेस्ट हाऊसला गेले, तिथे मला दोन पोलिस अधिकारी दिसले. मी त्यांना संपूर्ण घटनेबद्दल सांगितले, पण त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी फक्त आमचा फोन नंबर घेतला आणि आमची नावे जाणून घेतली. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करावी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रियंका गांधींनाही घटनेबद्दल माहिती दिली. प्रियंका गांधींनी त्यांना सभापतींकडेही नेले आणि तिथेही तक्रार दाखल करण्यात आली. देशाच्या गृहमंत्र्यांना एक मेल देखील लिहिला आहे, उत्तराची वाट पाहत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.