Bhoot Chaturdashi 2025
ज्या दिवशी महाराष्ट्रात नरक चतुर्दशी साजरी केली जाते त्याच दिवशी पश्चिम बंगालमध्ये भूत चतुर्दशी नावाचा सण साजरा केला जातो. या सणाला भूत चतुर्दशी का म्हणतात? नावाप्रमाणेच, खरंच या सणाचा संबंध भूतांशी आहे का? काय आहे या सणा मागचा इतिहास… ज्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला त्या दिवशी देशभरात नरक चतुर्दशी साजरी केली जाते. महाराष्ट्रात याच दिवशी पहिली आंघोळ केली जाते, आपल्या डाव्या पायाने कारूट फोडून अंगाला उटणे लावून दिवाळीची सुरुवात करतात. पण पश्चिम बंगालमध्ये काहीतरी वेगळं असतं. तेथील लोकांचे असे मानणे आहे की या दिवशी आपले पूर्वीच्या 14 पिढ्या ज्या निसर्गात विलीन झाले आहेत ते आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वीतलावर येतात. त्यांच्या स्वागतासाठी बंगालमध्ये भूत चतुर्दशी नावाचा सण साजरा केला जातो.
भुता चतुर्दशी बंगाली लोकांच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तेथील लोकांच्या म्हणण्यानुसार या दिवशी आपल्याला भेटण्यासाठी आलेले आपले 14 पिढ्यांचे पूर्वज त्यांचा पाहुणचार घेण्यासाठी खास आपल्याकडे आले असतात. त्यावेळी तेथील लोक त्यांच्या या पूर्वजांच्या पाहुणचारात कसलीही कमतरता जाणवू देत नाहीत. त्यांच्या स्वागतासाठी घराभोवती 14 मातीचे दिवे पेटवले जातात. हे 14 दिवे त्या 14 पिढ्यांच्या पूर्वजांच्या नावाचे असतात.
येथील लोकांचे असे मानणे आहे भूत चतुर्दशीच्या रात्री भूतांचे सावट असते. या दिवशी वाईट आत्मा अधिक सक्रिय असतात. तर चांगल्या आत्मा आपल्या वंशजांना भेटण्यासाठी खास आलेल्या असतात. पण वाईट आत्म्यांचाही प्रभाव फार असतो त्यामुळे या रात्री फार कोणी घराबाहेर फिरकत नाही. लहान मुलांना तर घराबाहेर काढलंच जात नाही. कारण हा दिवस काळा कांडांसाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी अनेक तांत्रिक जण त्यांचे काळे कांड करत असतात आणि अशावेळी लहान मुलांचे अपहरण होत असतात.
भूत चतुर्दशीच्या या रात्री आई चामुंडाची पूजा केली जाते. असे म्हणतात की देवी चामुंडा आई वाईट आत्म्यांचा सर्वनाश करते. या दिवशी घरामध्ये 14 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. या भाज्या हिरव्या पालांच्या असतात, जे त्या 14 पूर्वजांना अर्पण केल्या जातात. पश्चिम बंगालच्या संस्कृतीत या दिवसाला एक विशेष मान आहे.