आग्रा : आग्र्यातील प्रजापती ब्रम्हकुमारी आश्रमात दोन सख्या बहिणींनी गळफास (Two Sisters Suicide) लावून आत्महत्या केली. एकता आणि शिखा असे मृत बहिणींची नावे आहे. या धक्कादायक घटनेनंतर आश्रमात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पोलिसांना एक तीन पानी सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये मृत बहिणींनी त्यांच्या आत्महत्येस संस्थेच्या चार जणांना जबाबदार धरले आहे. यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी या सुसाईड नोटवरुन आरोपींचा शोध सुरू केला आहे. उत्तरप्रदेशच्या आग्र्यातील जगनेर येथे प्रजापती ब्रम्हकुमारी नावाचे आश्रम आहे. या आश्रमात एकता आणि शिखा यांनी वर्षापूर्वी दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जगनेर येथे ब्रह्मा कुमारी केंद्र बांधले होते, ज्यामध्ये दोघेही राहत होत्या.
संस्थेच्या चार जणांना धरले जबाबदार
पोलिसांनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी दोघींनी तीन पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी आत्महत्येसाठी संस्थेच्या चार जणांना जबाबदार धरले आहे. या चारही आरोपींवर पैशांचा अपहार तसेच अनैतिक कृत्ये केल्याचा आरोप आहे. तसेच आसाराम बापूप्रमाणे आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षा करावी, अशी मागणीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुसाईड नोटमधून त्यांनी केली आहे.