West Asia Conflict : पश्चिम आशिया संघर्षात 23 भारतीयांचा मृत्यू; 15 नाविकांचा समावेश, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, सौजन्य : आयएएनएस
पश्चिम आशियातील संघर्षाचा (West Asia Conflict) फटका भारतीय नागरिकांनाही बसत असून आतापर्यंत 23 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 भारतीय नाविकांचा समावेश आहे. तसेच काळ्या समुद्राच्या (Black Sea) क्षेत्रात व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये 5 भारतीयांचा मृत्यू झाला असून दोघे अद्याप बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी मंगळवारी साप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ओमानच्या किनाऱ्याजवळ दोन नोव्हेंबर रोजी एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. या जहाजावर एकूण 14 भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी 13 जणांना सुरक्षित वाचविण्यात आले. या बचावकार्यासाठी भारताने ओमान सरकारचे आभार मानले आहेत.
जायसवाल यांनी सांगितले की, यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षात 22 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये 14 भारतीय नाविकांचा समावेश होता. मात्र, ओमानजवळील जहाजावरील हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे. त्यात 15 नाविकांचा समावेश आहे.
हल्ल्यातून बचावलेल्या 13 भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. तसेच मृत भारतीय नागरिकाचा पार्थिव देह भारतात आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, ओमान सरकारशी समन्वय साधत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
या घटनेनंतर भारताने पश्चिम आशियातील सर्व संबंधित पक्षांना संवाद आणि राजनैतिक मार्गाने संघर्ष सोडविण्याचे आवाहन केले आहे. या प्रदेशात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, तसेच आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील जहाजांची सुरक्षित आणि मुक्त वाहतूक पुन्हा सुरळीत व्हावी, अशी भूमिका भारताने मांडली आहे.
India Fruit Export : भारतीय डाळिंब अन् किवीला दुबईची बाजारपेठ; शेतकऱ्यांना मिळाला 50 टक्के अधिक भाव
काळ्या समुद्राच्या परिसरात व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत विचारले असता जायसवाल यांनी आतापर्यंत 5 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. याशिवाय 2 भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, ओमानच्या लीमाह परिसराजवळ ‘एमएसव्ही अल जुसुफी’ या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. जहाजावरील 14 भारतीयांपैकी 13 जणांना वाचविण्यात आले; मात्र एका भारतीयाचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला. या घटनेबद्दल भारताने शोक व्यक्त केला आहे.
व्यावसायिक जहाजांवरील हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तणाव तातडीने कमी करून राजनैतिक चर्चेद्वारे तोडगा काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे आवाहन भारतानं केले आहे. व्यावसायिक जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवावे, तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सागरी मार्गांवरील वाहतूक आणि व्यापार विनाअडथळा सुरू ठेवावा, अशीही भारताची मागणी आहे.
Ans: परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील संघर्षात आतापर्यंत 23 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Ans: काळ्या समुद्र क्षेत्रातील व्यावसायिक जहाजांवरील हल्ल्यांत 5 भारतीयांचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत.
Ans: भारताने व्यावसायिक जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध केला असून संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.






