
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सायंकाळी ४ नंतर त्यांच्या वडिलोपार्जित गावी दाखल झाले. यानंतर त्यांनी आईच्या पार्थिवाचे दर्शन घेत पुष्प अर्पण केले. यानंतर त्यांनी आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यानंतर योगी आदित्यनाथ हे काही क्षण आईच्या पार्थिवासमोर शांतपणे उभे राहिले. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले. कठोर निर्णय घेणारा आणि नेहमी कर्तव्याला प्राधान्य देणारा नेता म्हणून ओळख असलेल्या योगींच्या या भावनिक क्षणाने सर्वांचे मन हेलावले.
योगी आदित्यनाथ शुक्रवारी गोरखपूर येथील चंपा देवी पार्कमध्ये आयोजित टॅबलेट वितरण कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण करण्यात येणार होते. विद्यार्थ्यांना शिक्षण, तंत्रज्ञान आणि यशाचे महत्त्व सांगत भाषण करत असताना त्यांना आईच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली.
मातृवियोगाची बातमी समोर आल्यानंतरही त्यांनी आपले भाषण मध्येच थांबवले नाही. वैयक्तिक दुःख मनात ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद सुरू ठेवला. कुटुंबासाठी अत्यंत कठीण असलेला क्षण असूनही त्यांनी संयम दाखवला.
योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे, आनंद सिंह बिष्ट यांचे, कोरोना काळात निधन झाले होते. त्यावेळी योगी लखनौमधील शासकीय निवासस्थानी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत होते. वडिलांच्या निधनाची माहिती त्यांना एका चिठ्ठीद्वारे देण्यात आली. माहिती वाचल्यानंतर त्यांनी ती चिठ्ठी खिशात ठेवली आणि बैठक सुरूच ठेवली होती.
नाथपंथाच्या संत परंपरेत दीक्षा घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी आपले जीवन समाज आणि लोककल्याणासाठी समर्पित केले. मात्र, आईच्या निधनानंतर अंतिम दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू त्यांच्या मनातील मुलाची भावनिक बाजूही अधोरेखित करून गेले. वैयक्तिक दुःख कितीही मोठे असले तरी जबाबदारीपासून दूर न जाण्याचा त्यांचा हा प्रसंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.