दुर्दैवी ! वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना तरुण नदीत बुडाला; काठावर पाय घसरला अन्... (File Photo : Drowned)
इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा येथे एक दुर्दैवी घटना उघडकीस आली. चंबळ खोऱ्यातील क्वारी नदीत वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना 22 वर्षीय तरुण पाण्यात बुडाला. याची माहिती पोलिसांसह स्थानिकांना समजातच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली. या तरुणाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. मात्र, 24 तासांनंतरही त्याचा शोध लागला नाही.
इटावा जिल्ह्यातील बिदोरी गावात मंगळवारी ही घटना घडली. संतोष कुमार तिवारी (वय २२) हा त्याचे वडील विनोद तिवारी यांच्या अस्थी आणि कपडे विसर्जित करण्यासाठी क्वारी नदीत उतरले होते. चिखलाच्या काठावर त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीत मगरी असल्याने आणि पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने त्यांना यश आले नाही. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय दंडाधिकारी ब्रह्मानंद कथेरिया, क्षेत्र अधिकारी रामबदन सिंह आणि वन अधिकारी एस. एन. यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गोताखोरांच्या मदतीने तरुणाचा शोध सुरू केला. मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत संतोषचा मृतदेह सापडला नाही. शोध मोहीम सुरू असून, शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तिवारी कुटुंबावर दुहेरी संकट
या दुर्दैवी घटनेमुळे संतोषच्या कुटुंबावर दुहेरील संकट ओढवले आहे. संतोष याचे वडील कुमार तिवारी यांचे नुकतेच निधन झाले. आणि आता त्यांच्या मुलाच्या पाण्यात बुडण्याने संपूर्ण कुटुंब दुःखात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील अलसुरे गावात रविवारी सायंकाळी गणेश विसर्जनाचा आनंदोत्सव काही क्षणातच शोकांतिका ठरला. जगबुडी नदीत गावातीलच मंगेश पाटील (वय ३५) हे युवक बुडून वारल्याने आनंदाचे वातावरण शोकमय झाले. दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी गावकरी जल्लोषात एकत्र जमले होते. ढोल-ताशांचा गजर, “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात मिरवणूक सुरू असताना पाण्यात उतरल्यानंतर मंगेश पाटील हे खोल पाण्यात गेले व क्षणातच दुर्दैवी घटना घडली.