काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरु; दोन विमानं सज्ज
जम्मू : काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन गुरुवारी (दि.24) मुंबईला येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर गुरुवारी 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100 असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक गुरुवारी मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 5 पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला धर्माच्या आधारावर करण्यात आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने घेतल्याचे म्हटले जात आहे. यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिस युनिफॉर्ममध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी तिथे बसलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारली. ते पर्यटक मुस्लिम नसल्याचे समजताच त्यांनी गोळीबार सुरू केला. बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या एका गटाने मॅगी खाणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पर्यटकांना त्यांची नावे विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.