कुठल्याही उद्योगात किंवा व्यवसायात सुरुवात, मध्य आणि अंत असे टप्पे येत असतात. हे टप्पे मुख्यत्वे तंत्रज्ञानाच्या बाबतीत असतात. त्यामुळे सध्या तेजीत वाटणारा एखादा उद्योग काही दिवसांनी डब्यात गेलेला दिसतो. तंत्रज्ञान बदललं की जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहणाऱ्या उद्योगांची वाताहत होते. एसटीडी बुथ, फोटोग्राफीचे कॅमेरे यांची जी अवस्था झाली, तीच आता आयटी उद्योगाची होणार असल्याचं पुढं येतंय.
बँक ऑफ अमेरिकाच्या अहवालात भारतीय आयटी क्षेत्रात लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. भारतात वाढत चाललेल्या ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे विप्रो, इन्फोसिस, कॉग्निजंट यासारख्या बड्या कंपन्यांमधील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते, असं या अहवालात म्हणण्यात आलंय. विशेषतः लो स्किल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाण अधिक असेल, असा अंदाजही या अहवालात आहे.
आयटी उद्योगातील अनेक ठिकाणी ऑटोमेशनचा वापर केल्यामुळे कंपन्यांचे सुमारे १०० कोटी रुपये वाचू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी या तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करण्यावर कंपन्यांचा भर राहणार, हे साहजिक आहे. भारतासह अनेक देशांमध्ये भारतीय नागरिक आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येनं नोकरी करतात. अशा एकूण १० लाख नोकऱ्या पुढील वर्षी जाऊ शकतात, असा अंदाज बँक ऑफ अमेरिकाच्या अहवालात वर्तवण्यात आलाय. [read_also content=”कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांच्या शरीरात तयार होणाऱ्या अॅंटीबॉडी टिकतात इतक्या दिवस https://www.navarashtra.com/latest-news/the-antibodies-produced-in-the-body-of-a-corona-free-citizen-last-as-long-nrpd-143310.html”]
भारत आणि चीन या दोन देशांनाच ऑटोमेशनचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. गल्फ देश आणि जपानला मात्र तितक्या मोठ्या प्रमाणात हा फटका बसणार नसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कोट्यवधी नागरिकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर आणि लाखो उद्योजक रस्त्यावर आल्यानंतर आता आयटी उद्योगासमोर नवं संकट उभं ठाकलंय.
लॉकडाऊनच्या काळात आयटी उद्योगाला फारसा फटका बसला नव्हता. वर्क फ्रॉम होमचं कल्चर अंगिकारण्यात या क्षेत्राचा सर्वाधिक पुढाकार राहिला. मात्र या अहवालानंतर आयटी क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.