Adani Group Vidarbha Investment: विदर्भाचा होणार औद्योगिक कायापालट! अदानी समूहाचा ७० हजार कोटींच्या मेगा 'प्लॅन' (फोटो-सोशल मिडिया)
Adani Group Vidarbha Investment: विदर्भासाठी अदानी समूहाकडून आनंदाची बातमी आहे. अदानी समूहाच्या पुढाकाराने लवकरच औद्योगिक पॉवरहाऊस होऊन नागपूरला ओळख मिळणार आहे. यासंबधित समूहाचे संचालक जीत अदानी यांनी माहिती दिली आहे. विदर्भ आता केवळ क्षमतेचा प्रदेश राहिलेला नाही, तर भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी एक नवीन केंद्र बनण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. मजबूत नेतृत्व, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उद्योग-सरकार भागीदारीसह, विदर्भ आपला ऐतिहासिक वारसा आर्थिक आणि औद्योगिक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करत असल्याचे अदानी समूहाने सांगितले आहे.
विदर्भाच्या औद्योगिक भविष्याला आकार देणाऱ्या प्रकल्पांपैकी, त्यांनी कलमेश्वरमधील लिंगा येथील प्रस्तावित ७०,००० कोटींच्या कोळसा गॅसिफिकेशन आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज कॉम्प्लेक्स महत्वाचा असून या प्रकल्पामुळे ३०,००० कामगारांना थेट रोजगार निर्माण होतील आणि स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत रासायनिक उद्योगांसाठी नागपूरला जागतिक नकाशावर स्थान मिळेल.
हा प्रकल्प स्वावलंबी भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल असून गोंडखैरी भूमिगत खाण प्रकल्पाचे वर्णन जबाबदार आणि पर्यावरणपूरक खाणकामाचे उदाहरण आहे, ज्यामध्ये किमान जमीन वापर, शून्य विस्थापन आणि जलसंवर्धनाला प्राधान्य दिले जाते. दरम्यान, बोरखेडी येथे ७५ एकर आयसीडी आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती चेकपोस्टचे अधिग्रहण विदर्भाला एक मजबूत लॉजिस्टिक्स गेटवे बनवत आहे. अशी माहिती अदानी यांनी दिली.
ते म्हणाले की, विदर्भ हे नावच त्याची ओळख आणि ताकद दर्शवते. प्राचीन काळापासून हा प्रदेश ज्ञान, संस्कृती आणि धैर्याचे केंद्र आहे. एकेकाळी मध्य प्रदेशची राजधानी असलेले नागपूर आता देशाच्या भौगोलिक केंद्रस्थानी असलेले लॉजिस्टिक्स, ऊर्जा, विमान वाहतूक आणि तंत्रज्ञानाचे उदयोन्मुख केंद्र आहे. असेही ते म्हणाले.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हटले की पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि संतुलित प्रादेशिक विकासावर त्यांचे लक्ष केंद्रित केल्याने विदर्भ गुंतवणुकीसाठी आकर्षक बनला आहे. तिरोडा येथील ३,३०० मेगावॅट सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट आणि बुटीबोरी येथील ६०० मेगावॅट प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामुळे महाराष्ट्राची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. २५ वर्षांच्या करारात सौर आणि थर्मल ऊर्जा एकत्रित करून ६,६०० मेगावॅट विश्वसनीय वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे, जी उद्योग, शहरे आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला आधार देते.






