RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान (Photo Credit- X)
मुंबईत आयोजित आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना मोहन भागवत म्हणाले, “बांगलादेशात आजच्या घडीला साधारण १.२५ कोटी हिंदू आहेत. ही संख्या कमी नाही. जर त्यांनी तिथेच राहून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार केला, तर त्यांना आम्ही इथून आपल्या सीमांच्या आत राहून आणि जगभरातील हिंदू आपापल्या स्थानांवरून शक्य ती सर्व मदत करतील – याची मी हमी देतो.”
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, जर बांगलादेशातील हिंदू एकवटले, तर ते तिथल्या राजकीय व्यवस्थेचा वापर स्वतःच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी करू शकतात. मात्र, यासाठी त्यांचे संघटित असणे ही प्राथमिक अट आहे.
Mohan Bhagwat: नागपूरमध्ये महाभारताचा दाखला देत NOTA वर गरजले मोहन भागवत, मतदान देत काय केले आवाहन?
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भागवत म्हणाले की, “यावेळी एक सकारात्मक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे हिंदूंनी तिथून पळून येण्याऐवजी तिथेच थांबून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा संघर्ष करायचा असतो, तेव्हा एकता महत्त्वाची असते. ते जितक्या लवकर एकत्र येतील, तितके त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी हिताचे ठरेल.”
देशाच्या भविष्याबद्दल भाष्य करताना सरसंघचालकांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले, “२०४७ मध्ये भारताचे पुन्हा विभाजन होईल, अशी भीती बाळगण्यापेक्षा २०४७ मध्ये ‘अखंड भारता’च्या उदयाची कल्पना केली पाहिजे. या भूमीवर ५०० वर्षे राज्य करणाऱ्या सुलतानांना आणि २०० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना भारत तोडता आला नाही, तर आजच्या स्वतंत्र भारतात तसे पुन्हा का होईल? आजचा भारत १९४७ चा भारत राहिलेला नाही. भारताने आता मोठी प्रगती केली आहे. जे भारताला तोडण्याचा विचार करतील, ते स्वतःच संपून जातील. भारत एकसंध राहील आणि आम्ही ते करून दाखवू.”
बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. छात्र नेता शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर तेथील स्थिती अधिकच चिघळली आहे. आगामी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका पार पडणार असून, त्यापूर्वी मोहन भागवत यांनी दिलेला हा संदेश जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.






