पाटणा : ट्रॅक्टरने (Tractor) शेत नांगरताना (Plowing) ५०० आणि १००० च्या नोटा बाहेर पडू लागल्या. यानंतर परिसरात नोटा लुटताना बघ्यांची गर्दी झाली होती. पाटणा (Patna) जिल्ह्यातील पालीगंज (Paliganj) उपविभागातील सिंगोडी पोलीस स्टेशन हद्दीतील सदर घटना घडली आहे. पसौदा गावात जमिनीतून नोट बाहेर पडल्याची माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. ज्याच्या हातात नोट (Old Notes) मिळाली, ती घेऊन ते पळून गेले.
पळसौदा गावात ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत असताना ५०० आणि १००० च्या नोटा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले पण तोपर्यंत सर्व नोटा शेतातून गायब झाल्या होत्या आणि लोक घेऊन पळून गेले होते. लोकांची ओळख पटवली जात असून पैसे कोणाचे आहेत आणि ते कधीपासून जमिनीत पुरले, हे नोटा मिळाल्यानंतरच कळेल, असे सिंगोडीचे पोलीस अधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले.
सिंगोडी पोलीस (Singodi Police) ठाण्याच्या हद्दीतील पळसौदा गावात राहणारे अजय सिंग यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होती. यावेळी सरकारने बंद केलेली ५०० आणि १००० रुपयांनी भरलेली पोती ट्रॅक्टरमधील नांगरात अडकली. चालकाने ट्रॅक्टरमध्ये अडकलेली गोणी (Sack) काढण्याचा प्रयत्न केला असता तेथील दृश्य पाहून तो थक्क झाला. गोणी फुटल्याने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा शेतात पसरल्या होत्या. त्यानंतर ट्रॅक्टर चालकाने गावात धाव घेत शेतमालक आणि ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. शेतातून मोठ्या प्रमाणात नोटा बाहेर पडल्याचे समजताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. जमेल तितक्या नोटा घेऊन ते पळून गेले.