Photo Credit- Social Media नागपूर हिंसाचारानंतर, मौलवींनी अमित शहांना पत्र लिहून केली मोठी मागणी
नागपूर: नागपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर नागपुरात शांतता असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे. या हिंसाचाराचा तपास सुरू असताना उत्तर प्रदेशातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपास सुरू असून, या दंगलीमागचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अशातच उत्तर प्रदेशातील एका मौलानांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मौलानांच्या मते, ‘छावा’ या चित्रपटात औरंगजेबला हिंदूविरोधी म्हणून दाखवले गेले, ज्यामुळे हिंदू युवक भडकले आणि त्यातून 17 मार्च रोजी नागपुरात दंगल उसळली. त्यामुळे या चित्रपटावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, नागपूर पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दंगलीची कारणे समजून घेतली आणि यामागील सूत्रधार शोधण्याचे निर्देश दिले. तसेच, ही दंगल औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागपूर सायबर पोलिसांनी गुरुवारी आणखी चार नवीन गुन्हे दाखल केले असून, एकूण ३४ जणांना आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. या सर्वांवर दंगलीस चिथावणी देणे, समाजात अस्थिरता पसरवणे, लोकांना भडकावणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही समाजकंटकांनी याला विरोध दर्शवत मोठ्या प्रमाणावर दगडफेक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे नागपूरमध्ये तणाव वाढला असून, गेल्या तीन दिवसांपासून परिस्थिती संवेदनशील आहे.
आता केंद्राच्या धर्तीवर शाळांमध्येही सुरु होणार CBSC पॅटर्न; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती
मौलाना शहाबुद्दीन यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चित्रपटात मुघल शासक औरंगजेबाचे पात्र अशा प्रकारे दाखवण्यात आले आहे की त्यामुळे हिंदू तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशातील वातावरण बिघडले आहे. चित्रपटात मुघल शासक औरंगजेबला हिंदूविरोधी दाखवण्यात आले आहे, त्यानंतर अनेक हिंदू नेते विविध ठिकाणी भडकाऊ भाषणे देत आहेत. पत्रात मौलानांनी चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक आणि लेखक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
मौलाना शहाबुद्दीन यांनी पत्रात असेही लिहिले आहे की, नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल आम्हाला सर्वांना वाईट वाटते. या घटनेनंतर आम्ही सर्व मौलानांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, औरंगजेब आमच्यासाठी फक्त एक मुघल शासक आहे. आम्ही त्यांना आमचा आदर्श मानत नाही आणि त्यांना आमचा नेता मानत नाही, असेही आम्हाला स्पष्ट करायचे आहे, असेही मौलवींनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.