आता शाळांमध्ये 'सीबीएसई पॅटर्न' (File Photo : Exam)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यापूर्वी म्हटले होते. यानंतर गुरुवारी भाजप नेते प्रसाद लाड यांनी सीबीएसई अभ्यासक्रमाबाबत प्रश्न विचारला. यावर लेखी उत्तर देत दादा भुसे यांनी राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिल्याची माहिती दिली आहे.
शिक्षणमंत्री भुसे यांनी म्हटले की, ‘राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२ ५-२६ या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का? असा प्रश्न प्रसाद लाड यांनी विचारला होता.
यावर उत्तर देताना दादा भुसे म्हणाले की, ‘राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच राज्याच्या बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून, राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
तसेच सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी एक एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
पहिल्या फेजमध्ये इयत्ता पहिली
राज्य शासनाच्या नियोजनानुसार, पहिल्या फेजमध्ये इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबविण्याबाबत आम्ही जाणार आहोत. येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न अॅडॉप्ट करणार आहोत. पुढच्या वर्षात दोन टप्प्यांत आपण दुसरी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी पॅटर्न अॅडॉप्ट होईल. सगळ्या विद्यार्थ्यांचे बदल लगेच केले तर ते अडॉप्ट करू शकणार नाहीत. त्यामुळे, पुढच्या वर्षाच्या दोन टप्प्यांत पूर्ण शिक्षण आपण सीबीएससी पॅटर्नवर जाऊ, असे मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.