चेन्नई : तमिळनाडूतील (Tamilnadu) मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुकच्या (AIADMK) हंगामी सरचिटणीसपदी एडाप्पडी के. पलानीस्वामी ऊर्फ ईपीएस (EPS) यांची निवड झाली आहे. पक्षात एकाच नेतृत्वावरून जे. जयललिता (J.Jaylalita) यांच्या अण्णाद्रमुक पक्षात वर्चस्वाच्या वादावरून ओ. पनीरसेल्वम ऊर्फ ओपीएस (OPS) आणि पलानीस्वामी या दोन नेत्यांमधील वाद मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) गेला होता. यावर निवाडा देत न्यायालयाने पलानीस्वामींच्या बाजूने निर्णय दिला.
पलानीस्वामी यांनी बोलाविलेल्या पक्षाच्या बैठकीवर स्थगिती आणावी, अशी मागणी पनीरसेल्वम यांनी केली होती. पण बैठकीवर स्थगिती आणण्यास कोणतेही कारण दिसत नसून पक्षांतर्गत बाबींत हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कोर्टाच्या मंजुरीनंतर पलानीस्वामी यांनी कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यात त्यांची हंगामी सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. तसेच, ओ. पनीरसेल्वम यांची प्राथमिक सदस्यपद आणि खजिनदारपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
पनीरसेल्वमचे समर्थकांनाही काढून टाकले. पक्षाच्या कार्यकारिणी समितीमध्ये १६ ठराव मांडण्यात आले आहेत. यापैकी एक पक्षातील दुहेरी नेतृत्व रद्द करण्याची मागणी करणारा आणि हंगामी सरचिटणीस म्हणून पलानीस्वामी यांची निवड करणारा दुसरा ठराव आहे. या बैठकीत समन्वयकांची पदे रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला. सध्या समन्वयकपदी पनीरसेल्वम होते, तर सहसमन्वयक पलानीस्वामी होते. यानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यालयात धरणे धरले. जयललिता यांची कायमस्वरूपी सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यानंतर आणि हे पद त्यांच्यासाठी राखून ठेवल्यानंतर हंगामी सरचिटणीस हे पद रिक्त ठेवण्यात आले होते.