‘विजेता’पूर्वी अमोल यांनी शिल्पा शिरोडकर आणि तिचा नवरा अपरेश रंजित यांची निर्मिती असलेल्या ‘सौ. शशी देवधर’या चित्रपटाखेरीज ‘दोन घडीचा डाव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘विजेता’मध्ये सुबोध भावे, पूजा सावंत, प्रीतम कागणे, सुशांत शेलार, माधव देवचके, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, देवेंद्र चौगुले, दिप्ती धोत्रे, कृतिका तुळसकर आणि गौरीश शिपुरकर या कलावंतांनी अभिनय केला आहे.
मराठीत प्रथमच विविध खेळांवर आधारीत चित्रपट बनवण्याबाबत अमोल म्हणाले की, ‘विजेता’ची स्क्रीप्टच मी स्पोर्टस फिल्म म्हणून लिहीलं. स्पोर्टस फिल्म असल्यानं मराठी निर्मात्यांचं पाठबळ उभं रहात नव्हतं. मी आणि सुरेश पै यांनी बरेच प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून येत नव्हत्या. हा चित्रपट एकाच खेळावर आधारित नसून, यात विविध खेळांचा समावेश आहे. अशा प्रकारचा प्रयोग मराठीमध्ये यापूर्वी झालेला नाही. नॅशनल गेम्ससोबतच विविध स्पोर्टस आणि माईंड कोच ही कॅान्सेप्टही आलेली नाही. त्यामुळं लेखन पातळीवर काम करताना खूप वेळ लागला. बरेच ड्राफ्टस लिहीलो. त्यावेळी निर्माते कोणीही नव्हते. मग सुरेशच मुक्ता आर्टसमध्ये फिल्म घेऊन गेला. आम्ही सुभाष घईंना पटकथा ऐकवली. त्यांना ती खूप आवडली आणि ‘विजेता’चा मुक्ता आर्टससोबतचा प्रवास सुरू झाला. घईंना या चित्रपटाची संकल्पना खूप आवडली होती. अंडरडॅागची व्हिक्ट्री ही चित्रपटाची कॅान्सेप्ट असून, मोटिव्हेटीव्ह असल्यानं त्यांना विषय पटकन आवडला. या चित्रपटाचा महत्त्वाचा युएसपी म्हणजे आम्ही ज्यांना ज्यांना ही गोष्ट ऐकवली, त्यांना त्यांना ती आवडली. घईंनाही आवडल्यानं त्यांनाही तो चित्रपट क्लीक झाला. घईंना माझं नॅरेशन खूप आवडलं होतं. चित्रपट पाहिल्यावर त्यांनी मला मिठी मारली आणि कौतुक केलं.
घईंकडून ग्रीन सिग्नल मिळण्यापूर्वी
घईंनी हा चित्रपट बनवायला ग्रीन सिग्नल दाखवण्यापूर्वी आम्ही दोन निर्मात्यांकडे गेलो होतो. त्यांनाही चित्रपटाची कथा खूप आवडली होती, पण रिस्क घ्यायला कोणी धजत नव्हतं. या चित्रपटाचं रिरायटींग करण्यात खूप वेळ गेला. एकूण नऊ ड्राफ्टस लिहिले. त्यामुळं स्क्रीप्ट खूप पक्की झाली. खरं तर चित्रपटाचा आवाका खूप मोठा होता. मराठीत स्पोर्टस फिल्मचा विषय कधी ट्राय केलेला नव्हता. यातील माईंड कोचची कॅान्सेप्ट निर्मात्यांना पटणं ही गोष्टही खूप महत्त्वाची होती. नवीन संकल्पना असल्यानं क्लीक होईल की नाही याची भीती निर्मात्यांना होती. नवीन आयडीया कधीच झालेली नसते म्हणून नवीन असते.
फर्स्ट चॅाईस सिलेक्शन!
कलाकारांची निवड तसं पाहिलं तर ऑटोमॅटीकली झाली. कारण सुबोध भावे, पूजा सावंत या कलाकारांची निवड करणं ही फर्स्ट चॅाईसच होती आणि त्यांनाही कॅान्सेप्ट आवडल्यानं ‘विजेता’साठी होकार दिला. खरं सांगायचं तर चित्रपटाचं लेखन करताना एकही कलाकार माझ्या डोळ्यांसमोर नव्हता. अख्खं कॅरेक्टर जेव्हा उभं राहिलं, तेव्हा त्यात सुबोधचा चेहरा दिसू लागल्यानं त्याला घेतलं. पूजानं साकारलेल्या कॅरेक्टरसाठी तिच योग्य वाटली. त्यामुळं तिला विचारलं. सर्व काही परफेक्ट असल्यानं कोणत्याही कलाकाराला नकार देण्यासाठी काही वावच नव्हता. इन्टेन्स माईंड कोचसाठी मला असा कलाकार हवा होता, जो सकल किंवा सूक्ष्म परफॅार्मन्स देऊ शकेल. त्यासाठी सुबोध फिट होता. त्यानंही त्याच्या परफॅार्मंसमध्ये इनपुटस दिले आहेत.
नॅशनल लेव्हलच्या कोचकडून प्रशिक्षण
‘विजेता’च्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आम्ही सहा महिने साई स्पोर्टस अकॅडमी ग्राऊंडवर नॅशनल लेव्हलचे कोचेस नेमले होते. सर्व कलाकारांना विविध खेळांमध्ये ट्रेनिंग दिलं आहे. पूजानं तिहेरी ॲथलीटचा रोल केलाय. तिचे स्विमिंग, सायकलींग आणि रनिंग असे तिनही इव्हेन्टस होते. तन्वी नावाची मुलगी बॅाक्सर होती. गौरी शिपूरकरनंही ट्रेनिंग घेतलं. माधव देवचके वेटलिफ्टर आहे. सगळ्या कलाकारांनी सहा महिने खूप कष्ट करून आपण स्क्रीनवर तरी ॲथलिटस दिसू यासाठी प्रयत्न केले. कलाकारांनी घेतलेली मेहनत चित्रपट पाहताना पडद्यावर जाणवते. आम्हाला ग्राऊंडवर एक स्लॅाट दिला जायचा. त्यावेळी आम्ही कलाकारांचं ट्रेनिंग करायचो.
कलाकारांचं कॅाम्बिनेशन
या चित्रपटाची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यात सर्वच कलाकारांचं कॅाम्बिनेशन असायचं. संपूर्ण चित्रपटभर सर्व कलाकार लागायचे. सगळे एकत्र एकाच शॅाटमध्ये लागायचे, पण सर्वांनी इतकं छान कोऑपरेट केलं की कोणताही प्रॅाब्लेम आला नाही. उदाहरण द्यायचं तर वेटलिफ्टींगचा इव्हेन्ट आहे. तो सीन माधववर शूट व्हायचा, पण क्राऊडमध्ये टीमचे इतर सदस्य असायचे. इतरांचे खेळ सुरू असताना पूजा क्राऊडमध्ये बसलेली दिसणं गरजेचं होतं. कलाकारांनी अशा प्रकारचं सहकार्य एकमेकांना केलं आहे. गिव्हींग खूप महत्त्वाचं ठरलं. दुसऱ्या ॲक्टरला आपली रिॲक्शन देण्यात कोणालाही कमीपणा जाणवला नाही. सिनेमात जशी टीम घडवली, तशीच टीम वास्तवातही तयार झाली होती, जिला जिंकायचं होतं.
आपल्या हाती काहीच नव्हतं
हा चित्रपट एक दिवसच थिएटरमध्ये रिलीज होऊ शकला आणि त्यानंतर लॅाकडाऊन लागलं हे सर्वांसाठी खूपच दुर्दैवी होतं. पहिल्याच दिवशी रसिकांचा रिस्पॅान्स खूप चांगला होता. दुसऱ्याच दिवशी लॅाकडाऊन झाला. आपल्या हाती काहीच नव्हतं. ते ॲक्सेप्ट करून पुढं चालणं आणि वाट बघणं हेच आम्ही केलं. पहिल्याच दिवशी का होईना, पण रसिकांनी सिनेमा एन्जॅाय केल्याचा आनंद संपूर्ण टीमला होता. त्या आनंदाच्या बळावरच आम्ही १९ महिन्यांच्या कालावधीनंतर ‘विजेता’ पुर्नप्रदर्शित करण्यासाठी सज्ज झालो आहोत. जो एफर्ट आपण घेतलाय त्याला कधी ना कधी यश मिळणार याची सर्वांना खात्री होती.
पावसानं केला घोटाळा…
‘विजेता’मध्ये एक प्रेरणादायी गाणं आहे. रोहन-रोहन यांनी खूप सुंदर म्युझिक केलं आहे. आदित्य बेडेकरनं दिलेलं पार्श्वसंगीतही सुरेख आहे. उदयसिंग मोहिते कॅमेरामन यांनी छान सिनेमॅटोग्राफी केली आहे. माझे असोसिएट डायरेक्टर महेश पावसकर, संकलक आशिष म्हात्रे, कला दिग्दर्शक सुनील निगवेकर होते. संपूर्ण सुंदर टीम जमून आली होती. शूटिंग पूर्ण करताना कमी संकटं आली असं नाही. पाऊस पडल्यानं शूट पूर्ण करायला ४०-४५ दिवस लागले. आम्ही पुण्यातील बालेवाडीमध्ये फायनल इव्हेन्ट शूट केला. त्या काळात अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळं शूटिंग बाधित झालं होतं.
सायकलींग आवडते
मुंबईतील असल्यानं क्रिकेट हा खेळ आवडतो, पण मी सायकलींग करतो. टेनिस खेळलो असल्यानं हा खेळही आवडतो. फुटबॅाल हा जगातील सर्वाधिक आवडता खेळ असूनही त्याकडं कधी आकर्षित झालो नाही. टूर दी फ्रान्स पाहतो. लान्स आर्मस्ट्राँग, पीटर सेगॅन, क्रिस फ्रूम हे आवडते सायकलीस्ट आहेत. प्रत्येकामध्ये एक विजेता दडलेला असतो. आमच्या सिनेमामध्ये सौमित्र नावाच्या माईंड कोचची भूमिका साकारणारा सुबोध प्रत्येकामध्ये दडलेला विजेता बाहेर काढतो. स्पोर्टस हा खूप मोटिव्हेशनल फॅक्टर आहे. मोटिव्हेशनल कथांची आज गरज असल्यानं हा सिनेमा आवर्जून पहावा.