पोलिसांचे निलंबन (फोटो- टीम नवराष्ट्र, freepik)
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. बदलापूरमधील प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. या घटनेच्या प्रारंभीच्या कारवाईत दिरंगाई करणाऱ्या तीन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
बदलापूर येथे चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकारामुळे बदलापूरमध्ये नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या ९ तासांपासून आंदोलक रेलरोको आंदोलन करत आहेत. पोलिसांनी अनेकदा आवाहन करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जवळपास एक तास आंदोलकांना विनंती केली. मात्र आरोपीला आजच्या आज फाशी द्या, नाहीतर त्याला आमच्या ताब्यात द्या असे म्हणत आंदोलकांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. आंदोलक ऐकण्यास तयार नसल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन सोडले आहे. यात आता सुरुवातीच्या काळात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या बदलापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांचे निलंबन करण्यात आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने हे ‘एक्स’ वर पोस्ट करत सांगितले, ”बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.”
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. #Badlapur
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
तसेच याआधीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले आहेत. आज सकाळपासून बदलापुरात वातावरण चिघळले आहे. गेल्या दोन तासांपासून बदलापूर रेल्वे मार्गावर संतप्त आंदोलकांनी रेलरोको केला आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे. पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण बदलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक कऱण्यात आली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.