सातारा : कोरोना संक्रमणाचा संसर्ग (Coronavirus) शहरात वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागात मुख्याधिकारी विरुद्ध आरोग्य निरीक्षक असे शीतयुद्ध किरकोळ कारणावरून सुरु झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे शहाजी वाठारे यांच्याकडे आरोग्य विभागाचा चार्ज देण्यात आला तरी त्यांनी तो स्वीकारलेला नाही.
आरोग्य विभागाचा कारभारी म्हणून प्रकाश राठोड यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट व प्रकाश राठोड यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. एका प्रकरणामध्ये वार्षिक दरापेक्षा जास्त दराचे एस्टिमेट बनविल्याने राठोड यांना चांगलेच बोल ऐकून घ्यावे लागले होते. या लुटपुटीच्या वादाचा वसुली विभागाच्या बैठकीदरम्यान जोरदार भडका उडाला. काही कारणावरून मुख्याधिकाऱ्यांनी तिन्ही आरोग्य निरीक्षक काहीच कामाचे नाही, अशी शेलकी कमेंट केल्याने राठोड रागाने उसळले आणि उभयतांमध्ये जोरदार वादावादी झाली. अगदी डीएमए ऑफिसपर्यंत एकमेकांचे अहवाल पाठविण्याचे वाद प्रतिवाद झाले. या प्रकरणाचा प्रत्यक्ष परिणाम लगेच दिसून आला.
मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ आरोग्य विभागाचा चार्ज पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्याकडे सोपवला. आता वाठारे पाणीपुरवठा विभागात हजर होऊन काहीच महिने झाले आहेत. अचानक आरोग्य विभागाची दुहेरी जबाबदारी आल्याने त्यांनी सुद्धा हे प्रकरण अधांतरीच ठेवले आहे. येत्या सोमवारपासून मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून या विभागाचा चार्ज घेण्याचा निर्णय घेऊ असे वाठारे यांनी सांगितले.






