पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रयत्न (फोटो- ai gemini)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिक्षण विभागातील काही विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत, संबंधित विद्यार्थ्यांनी माफी मागावी आणि मुलींच्या सुरक्षिततेची खात्री द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आंदोलन सुरू केले. पहाटे ३.२५ च्या सुमारास ३०० हून अधिक विद्यार्थिनी वसतिगृह बाहेर पडून रस्त्यावर उतरल्या. या वेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेविरोधात घोषणाबाजी केली. काही विद्यार्थिनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यातही पोहोचल्याची माहिती आहे.
विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या बाहेर विद्यापीठाच्याच दोन विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीची अनुचित चौकशी करून भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने अनेक विद्यार्थिनींनी एकत्र येऊन कुलगुरूंची भेट घेऊन कठोर कार्यवाही करण्याबाबत निवेदन दिले आहे. विद्यापीठाने शिक्षण विभागाच्या प्रमुख गीता शिंदे यांच्यावर मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे.
आंदोलनादरम्यान शिक्षण विभागाचे विभागप्रमुख, मुलींच्या वसतिगृहाच्या रेक्टर, सुरक्षा विभागाचे प्रतिनिधी तसेच पोलीस उपस्थित होते. विद्यार्थिनींनी सुरक्षा रक्षक आणि वसतिगृह प्रशासनाला जाब विचारत, तक्रारींची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. संबंधित विद्यार्थिनीला न्याय मिळावा, दोषारोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आंदोलकांची भूमिका होती.
“विद्यापीठ आवारात विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठाने सदर बाब गांभिर्याने घेतली आहे. त्या अनुषंगाने सदर विद्यार्थ्यांविरूध्द विद्यापीठामार्फत पोलिसात तक्रार दाखल करण्यात येत असून त्या दोन्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभागातील व वसतिगृहातील प्रवेश तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकाराची कुलगुरूंनी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल.” असे जनसंपर्क अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी कळवीले.
“चर्चा आणि अंतर्गत बैठकांनंतर, आम्ही मुलींच्या वसतिगृहाचे सहाय्यक मुख्य रेक्टर प्रवीण तलअत यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, आम्हाला मुख्य रेक्टर सोनिया नागराळे यांचा राजीनामा प्राप्त झाला आणि तो आम्ही स्वीकारला. आता कठोर उपाययोजना केल्या जातील. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एक कायदेशीर समितीही स्थापन करत आहोत आणि यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.”
प्रा. डॉ. सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ






