सजावटीत लॅम्प ही वस्तू अतिशय महत्त्वपूर्ण असते. घराची सजावट करताना एखादा कोपरा किंवा विशिष्ट जागा अर्थपूर्णरीत्या उठावदार करायची असेल तर लॅम्पची रचना हमखास केली जाते. यामुळे संपूर्ण खोलीला एक वेगळाच उबदार स्पर्श प्राप्त होतो.
याआधी तुम्ही घरातील कोणत्याही खोलीत लॅम्पची मांडणी केली नसेल तर करून बघा, तुमचे घर नक्कीच उठावदार दिसेल. शिवाय हे काम अगदी एका दिवसात होण्यासारखे आहे. आपल्या आवडीचा लॅम्प इलेक्ट्रिशियनकडून लावायला तुमचा फार वेळ जाणार नाही. फक्त घरात कोणत्या जागेत लॅम्प लावायचा आहे, त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा लॅम्प चांगला दिसेल याचा विचार करून लॅम्पची निवड करा.
[read_also content=”महत्वाची आहे बाळाची झोप https://www.navarashtra.com/latest-news/baby-sleep-is-important-nrng-184867.html”]
एखादा कोपरा निवडा
पूर्वी लॅम्प किंवा इलेक्ट्रिक दिव्यांचे प्रकार म्हटले की, झुंबर हाच एकमेव प्रकार अस्तित्वात होता. पण आज मात्र लॅम्पमध्ये भरपूर वैविध्य दिसून येते. वॉल लॅम्प, पिक्चर लॅम्प, हँगिंग लॅम्प, टेबल लॅम्प, फ्लोअर लॅम्प असे भरपूर प्रकार आहेत. अगदी झुंबर या प्रकारातही निवडीसाठी अनेक पर्याय आहेत. पूर्वीची झुंबरे ही आकाराने चांगली प्रशस्त होती.
कारण मोठी घरे, बंगले, वाडे यामध्ये झुंबरे उठून दिसायची. आजही मोठ्या आकारातल्या झुंबरांबरोबरच छोटय़ा आकारातली झुंबरसुद्धा पाहायला मिळतात. दिवाणखान्याचे आकारमान लहान असेल तर सिलिंगला मध्यभागी असे एखादे झुंबर मस्त दिसेल. संध्याकाळी, रात्री याचा प्रकाश खूप सुंदर भासतो. पण झुंबरासाठी सिलिंगला तशी रचना नसेल तर लॅम्पसाठी दिवाणखान्यातील एखादा कोपरा निवडावा.






