सौजन्य - नवराष्ट्र टीम
अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच ओतूरसह संपूर्ण जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली. दादांचे ओतूरशी असलेले नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. विकासाचा ध्यास आणि शब्दाचा पक्का नेता म्हणून त्यांची ओळख असल्याने, आज त्यांना निरोप देताना अबालवृद्धांचे डोळे पानावले होते. ग्रामीण रुग्णालय परिसरात जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आपला आधारवड हरपल्याचे दुःख स्पष्टपणे जाणवत होते.
अंत्यविधीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, ओतूरमधील कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने जुन्या बस स्थानकासमोर भव्य एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती. या स्क्रीनवर जसे दादांचे पार्थिव दिसले, तसे उपस्थित जनसमुदायाला अश्रू अनावर झाले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी या स्क्रीनसमोर उभे राहून हात जोडून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. शिस्तीचे पालन करत ओतूरकरांनी एका महान नेत्याला अखेरचा सलाम केला.
दरम्यान अजित दादांच्या निरोपासाठी ओतूरमधील सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले होते. राजकारणातील गट-तट बाजूला सारून शिवसेना, भाजप, उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा म्हणजे प्रशासनाचा कणा होते, त्यांच्या एका शब्दावर कामे मार्गी लागत, अशा भावना यावेळी बोलताना ओतूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच छाया तांबे यांनी बोलताना व्यक्त केल्या. ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे सक्षमीकरण असो वा परिसरातील सिंचनाचे प्रश्न, दादांनी नेहमीच ओतूरला झुकते माप दिले, याची आठवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार थोरात यांनी करून दिली.
जसा अंत्यविधीचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला, तसा ओतूरमध्ये जमलेल्या जनसमुदायाचा संयम सुटला. “जोपर्यंत चंद्र-सूर्य राहील तोपर्यंत अजित दादांचे नाव राहील,” आणि “अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे” या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. उपस्थित प्रत्येक कार्यकर्ता आपल्या लाडक्या नेत्याच्या कर्तृत्वाचा जयजयकार करत होता.
ग्रामीण रुग्णालयासमोर यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले यांनी बोलताना सांगितले की, दादांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण केले. कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याची विचारपूस करणारा असा मोठा नेता पुन्हा होणे नाही. तर ओतूर येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या शोकप्रस्तावात सहभाग नोंदवला. यावेळी ओतूर शहरात ठिकठिकाणी दादांच्या कार्याचा गौरव करणारे फलक लावण्यात आले होते.
अजित दादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते आणि स्पष्टवक्ते पर्व संपले आहे. ओतूरच्या मातीने आज आपला एक खंदा पुरस्कर्ता गमावला आहे असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयासमोर जमलेला तो जनसमुदाय आणि प्रत्येकाच्या डोळ्यातील पाणी हेच सांगत होते की, दादा तुम्ही शरीराने गेला असलात तरी तुमच्या कामाच्या स्वरूपात तुम्ही ओतूरकरांच्या हृदयात सदैव ‘अमर’ राहाल.
अजित दादा आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांनी केलेली विकास कामे आणि कार्यकर्त्यांची जोडलेली मोठी साखळी यांच्या माध्यमातून ते कायम स्मरणात राहतील दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील एक सुवर्णयोग संपले आहे यांची उणीव कधीही भरून काढता येणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते विनायक तांबे यांनी बोलताना व्यक्त केले.






