फोटो सौजन्य - Social Media
शौर्य, जिद्द, चातुर्य आणि असामान्य नियोजनकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य संकटांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. केवळ पराक्रमाने नव्हे, तर बुद्धी, दूरदृष्टी आणि रणनीतीच्या बळावर महाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या कपटी आणि दगाबाज शत्रूला पुरून उरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी अध्याय म्हणजे आग्रा स्वारी. हाच ऐतिहासिक थरार आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
स्वराज्य उभारणीच्या प्रवासात महाराजांना अनेक वेळा जीवावर बेतणाऱ्या संकटांचा सामना करावा लागला. मात्र प्रत्येक वेळी सजगता, नियोजन आणि धैर्याच्या जोरावर त्यांनी त्या संकटांवर विजय मिळवला. आग्रा भेट ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य पुरावा आहे. या चित्रपटात ‘आग्रा स्वारी’चे नेमके नियोजन कसे करण्यात आले, औरंगजेबाच्या दरबारात महाराजांनी कशा प्रकारे धैर्य आणि बुद्धीचा प्रत्यय दिला, तसेच त्या प्रसंगातून त्यांनी संपूर्ण जगाला काय संदेश दिला, हे थरारक पद्धतीने मांडण्यात आले आहे.
चित्रपटातून हे ठळकपणे अधोरेखित होते की विजय केवळ बळावर नाही, तर बुद्धी, संयम आणि योग्य नियोजनावर अवलंबून असतो. औरंगजेबासारख्या बादशहाला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक प्रसंगाचा भव्य अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी) आणि मुरलीधर छतवानी हे निर्माते आहेत. सहनिर्माते म्हणून रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी यांच्यासह अनेक नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे, संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे, तर संगीत अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांचे आहे. पार्श्वसंगीत, कलादिग्दर्शन, वेशभूषा आणि साहसदृश्ये या सर्व बाबींमध्ये भव्यता जपण्यात आली आहे. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे वर्ल्डवाइड वितरण करणार असून, ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बुद्धिमत्तेला नवा अभिवादन ठरणार आहे.






