सोलापूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी (दि.२७) सोलापूर जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व शहरी भागात पार पडली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण मोहिम उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्या हस्ते पंढरपूर येथे बालकांना दोन थेंब पोलिओची मात्रा देण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी भागातील पाच वर्षाखालील एकूण 339554 बालके असून, ग्रामीण भागात एकूण 2418 आणि नागरी भागात 198 लसीकरण केंद्र, 144 मोबाईल टीम, 205 ट्रान्झिट टीम स्थापन करण्यात आले होते.
सोलापूर जिल्ह्यात 95.4 टक्के बालकांना पोलिओ लस देण्यात आली. उर्वरित बालकांना २८ फेब्रुवारी ते 4 मार्च २०२२ या पाच दिवसात आरोग्य कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत घरोघरी, वाडी वस्ती, उसतोड टोळी, वीट भट्टी इत्यादी ठिकाणी भेट देऊन लस देण्यात येणार आहे.