नाशिक (Nashik). आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार, चिकित्सा सेवा आणि संशोधनासाठी कार्य करणाऱ्या नाशिक येथील आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय कार्यालय ‘ चरक सदन ‘ चे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झाले. नाशिकमधील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय चिकित्सा अनुसंधान दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर जयंतराव देवपुजारी होते. मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
करोना मुळे जगाला वैद्यकीय क्षेत्राचे महत्व चांगल्या रीतीने समजले आहे कोणती उपचार पद्धती श्रेष्ठ यावर वाद विवाद करण्यापेक्षा आयुर्वेदाला समर्पित असणाऱ्या व्यक्तींनी सर्व उपचार पद्धतींना बरोबर घेऊन करोना काळात मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य करावे कारण आयुर्वेदाचे उगमस्थान हिंदुस्थान किंवा भारत असून इतर उपचार पद्धती या आजाराचा विचार करतात तर आयुर्वेद जीवन शैली चा विचार करून आजार कसा होणार नाही आणि मनुष्यप्राणी आयुष्यभर कसा निरोगी राहील याचा विचार करते त्यामुळे आयुर्वेदाचे महत्त्व निर्विवाद आहे असे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यावेळी म्हणाले.
ते म्हणाले की करोना स्थितीमुळे जगामध्ये आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे आयुर्वेदिक जीवनपद्धतीचे आचरण आपल्या नित्य कर्माचा भाग व्हायला हवा त्यासाठी आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज आयुर्वेदाचे ज्ञान मिळविणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या ऋषिमुनींप्रमाणे व्रतस्थपणे प्रयत्न करणे आजच्या काळात आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये व्यक्तिपरत्वे चिकित्सा करून रुग्णांवर औषध योजना केली जाते त्यामुळे आजाराचे समूळ उच्चाटन होते.
आजही आयुर्वेदिक औषध उपचार कमी खर्चात उपलब्ध आहेत , बदलत्या काळानुसार जगातील विविध ज्ञानाची संशोधनात्मक चिकित्सा करून हे ज्ञानही आयुर्वेदिक उपचार पद्धतीने स्वीकारले जाते संपूर्ण जगाला निरामय आरोग्य मिळवून देण्यासाठी आजार होऊच नये या साठी जीवन शैली बनविणाऱ्या आयुर्वेदिक उपचार पद्धती बरोबर जगातील अन्य उपचार पद्धती चालत राहतील जगाला निरामय आरोग्य मिळवून देण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीला नेतृत्व करायचे आहे असेही भागवत म्हणाले.






