मुंबई : उदारीकरण, जागतिकीकरण तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व याच्या वापरामुळे समाजात सकारात्मक बदल होत आहे. यात समकालीन प्रश्न व विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे भविष्यातील आत्महत्या टाळण्यासाठी बालवयातच मानसिक वाढ निकोप व निरोगी करणे ही काळाची गरज असल्याचे मत मनोविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मागील काही वर्षात मराठवाडा, विदर्भ, आंध्र प्रदेश, कर्नाटक पंजाब व भारताच्या इतर भागात कर्जबाजारी, दारिद्रय, बेरोजगारी आणि उपासमार या कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आजही आपण या आत्महत्या थांबवू शकत नाही, तर याचबरोबर आता शहरी भागातील सुखवस्तू कुटुंबातील तरुण पिढीमध्ये देखील आत्महत्येचे सत्र सुरु झाले आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येने तर संपूर्ण देशाला धक्का बसला. तर, सोमवारी ४१ वर्षीय डॉक्टर शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून घेऊन आत्महत्या केली. या घटनेनेही सामाजिक, राजकीय क्षेत्रात जबर धक्का बसला आहे. आत्महत्येचे हे सत्र कुठे तरीही रोखणे गरजेचे आहे?
याकरीता बाल संगोपन, वयात येणाऱ्या मुलामुलींना वैचारीक मार्गदर्शन करताना त्यांना अडचणींपासून कसे दूर राहावे तसेच अडचणींवर कशी मात करावी याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
याबाबत अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ डॉ. प्रतीक सुरंदशे यांनी सांगीतले की, ‘जागतिक पातळीवर पाहता, मागील ४५ वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात ६० टक्के वाढ झाली आहे. वय वर्षे १५-४५ यात आत्महत्या हे मृत्यूच्या प्रमुख तीन कारणांमध्ये आहे.
भारतात देखील तरुणांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ४० टक्के लोक १५ ते ४० वर्षे या वयोगटातील आहेत. यात नुसता प्रयत्न करण्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण एक भयानक स्वरूप घेत आहे. हे जर का थांबवायचे असेल तर आपल्या शिक्षण पद्धतीत सुद्धा बदल घडवून आणणे महत्वाचे आहे, कारण शाळेमध्ये आपल्याला आपल्या सर्व अवयवांची माहिती दिली जाते परंतु आपल्या मनाविषयी कोणतेही ज्ञान अथवा योग्य माहिती दिली जात नाही. बाल संगोपन तसेच वयात येणाऱ्या मुलामुलींनी मार्गदर्शन करताना त्याना अडचणींपासून कसे दूर राहावे त्यासोबतच अडचणींवर कशी मात करावी याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
चूक झाल्यानंतर मुलांना शिक्षा करताना त्यांची तुलना इतर मुलांशी अथवा कुटुंबातील व्यक्तीशी करू नये. मानसिक आजार, सततची चिंता, वेदनामय पूर्वायुष्य, रॅगिंग, स्वभाव दोष, बायपोलर डिसऑर्डर, व्यसनाधीनता, एकाकीपणा, रागीटपणा, प्रेम संबंधातील वितुष्ट, आर्थीक विवंचना, अनुवांशिक मानसिक विकार, वैचारिक गोंधळ, दीर्घकालीन आजार अशी अनेक कारणे आत्महत्या होण्यास कारणीभूत ठरत असली तरी अनेक वेळा घरच्या लोकांकडून अजाणतेपणामुळे झालेले दुर्लक्ष आत्महत्या वाढण्यास कारणीभूत आहे. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडल्यावर कमकुवत मन असलेल्या व्यक्तीची काळजी घेणे फार महत्वाचे असते, परंतु अनेकवेळा कामाच्या व्यापामध्ये याकडे दुर्लक्ष होते.
महत्वाचे म्हणजे, वैद्यकीय अहवालानुसार ९० टक्के लोक आत्महत्या करण्यापूर्वी कोणाला तरी आपले दुःख अथवा त्रास सांगण्याचा प्रयत्न करतात व अनेकवेळा त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही.
सतत उदास राहणे, जेवण व झोप कमी होणे, जिवाला धोका होईल असे कृत्य सहन करणे ही प्राथमिक लक्षणे आढळून आल्यावर नातेवाईकांनी लगेचच त्यावर कृती करणे महत्वाचे असते. अशा व्यक्तीना कधीही सहजतेने घेऊ नये,त्यांना सहानुभूती द्यावी, जेणेकरून त्यांचा एकटेपणा व असाह्यपणा दूर होण्यास मदत मिळते त्यानंतर लगेचच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी’ हल्लीच्या स्वतंत्र कुटुंबपद्धतीच्या काळात मुलांकडे पालकांना हव्या तितक्या प्रमाणात लक्ष देता येत नाही. मुलांना वाढत्या वयात जवळच्या आणि आपल्या’ माणसांचा सहवास आणि सल्ला मिळत नाही. यासाठी बालपणी जाणीवपूर्वक काही गोष्टी रुजवणे आवश्यक असते.
मुळात पालकांनी मुलाची सर्वांगीण वाढ ही अभ्यास, कला आणि क्रीडा क्षेत्रात त्याने नैपुण्य प्राप्त करण्यापुरती मर्यादित नसते तर त्याची मानसिक वाढ निकोप, निरोगी असली पाहिजे याकडे लक्ष पुरवले पाहिजे अशी माहिती मनोविकारतज्ञ डॉ प्रतीक सुरंदशे याने दिली.