प्रेयसीच्या प्रेमात इंजिनिअर नवरा झाला आंधळा; पत्नीला वाऱ्यावर सोडले अन्... (Photo Credit- AI)
सिकंदराराऊ भागातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न अडीच वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लावून दिले होते. या लग्नात वडिलांनी १० लाख रुपयांहून अधिक खर्च केला होता. मात्र, लग्न झाल्यापासूनच “आमचा मुलगा कम्प्यूटर इंजिनिअर आहे” असे टोमणे मारत सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. अतिरिक्त हुंड्यात ‘बुलेट’ मोटारसायकलची मागणी पूर्ण न झाल्याने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती.
पीडितेचा पती गुरुग्राममधील एका नामांकित कंपनीत कम्प्यूटर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच त्याने पत्नीशी बोलणे बंद केले आणि तिचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. पतीने गावात येणेही बंद केल्यामुळे संशय आलेल्या पत्नीने आपल्या भावासोबत गुरुग्राम गाठले. तिथे तिला धक्कादायक वास्तव समजले.
गुरुग्राममध्ये चौकशी केली असता, पतीचे त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका सहकारी तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले. जेव्हा पत्नीने याला विरोध केला, तेव्हा पतीने त्याच्या प्रेयसीसोबत मिळून पत्नीलाच बेदम मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने एप्रिल २०२५ मध्ये गुडगाव पोलिसांतही तक्रार केली होती.
गुडगावमधील वादांनंतर पीडिता आपल्या सासरी परतली, मात्र तिथेही तिला दिलासा मिळाला नाही. मेहुणा आणि मेहुणीने तिला मारहाण करत तिचे दागिने आणि पैसे हिरावून घेतले. “आता आमच्या दिराचे लग्न सोबत काम करणाऱ्या मुलीशी झाले आहे,” असे सांगत तिला घरातून हाकलून देण्यात आले. अखेर, पीडितेच्या तक्रारीवरून महिला पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






