इंदापूर : फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याचरात्री चोरट्यांकडून होणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करत पाऊण तासाच्या ३१ किलोमीटरच्या थरारक पाठलागानंतर इंदापूर पोलीसांनी भिगवण पोलिसांच्या सहकार्याने चोरीस गेलेले १० लाख २४ हजार २६० रुपये किंमतीचे दोनशे लिटर डिझेल ताब्यात घेतले. गेल्या महिन्याच्या शुक्रवारी (दि.२४) ही घटना घडली.
या संदर्भात महेंद्र रामचंद्र खाडे व पोलीस कर्मचारी पी. एस. शिंगाडे यांनी स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या आहेत. अज्ञात परप्रांतीय डिझेल चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या शोधार्थ पोलीसांचे पथक रवाना झाले आहे.
सविस्तर हकीकत अशी की, २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तरंगवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील जे. के. जगताप ॲन्ड कन्स्ट्रक्शन यांच्या क्रशर प्लँटवरील महेंद्र रामचंद्र खाडे यांच्या पोकलेन मशीनमधील दोनशे लिटर डिझेल, दहाचाकी ट्रकवरील अज्ञात चालकाने चोरुन नेल्याची घटना घडली. त्याचरात्री खाडे यांनी इंदापूर पोलीसांकडे फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी पोलीस पथके तयार करुन ती शोधार्थ रवाना केली. रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास डोंगराई सर्कलजवळ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन संशयित ट्रक भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने चालल्याचे पोलिसांना दिसले. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, पोलीसांच्या वाहनाला कट मारून तो ट्रक पुढे निघून गेला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व पोलीस शिपाई पी. एस. शिंगाडे यांनी ट्रकचा सरकारी पाठलाग केला. ट्रकचालकाने वेळोवेळी ट्रक पोलीसांना आडवा घालत शासकीय कामात अडथळा आणला. पोलीसांनी भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दडस पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली.
दरम्यान, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील डाळज नं.२ च्या हद्दीतील हॉटेल देवा फुड्ससमोर संशयित ट्रकचालकाने त्याचे ताब्यातील ट्रक उभा केला. त्यामधील सर्व आरोपी फरार झाले. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी तो ट्रक ताब्यात घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहायक पोलीस निरीक्षक एम. ए. माने, सहाय्यक फौजदार सतीश ढवळे, पोलीस नाईक एम. एस. मड्डी, पोलीस शिपाई पी .एस. शिंगाडे, पोलीस शिपाई व्ही. यु. काळे, पोलिस शिपाई व्ही. एस. जाधव यांनी ही कामगिरी पार पाडली. सहायक पोलीस निरीक्षक एम. ए. माने पुढील तपास करत आहेत. डिझेल चोरीतील मुद्देमाल पकडण्याची इंदापूर पोलीसांची ही सलग दुसरी कामगिरी आहे.