चंदिगड : पंजाबमध्ये (Punjab Assembly Election) विधानसभा निवडणुकांची मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाची (Election Commission) बैठक झाली असून, निर्णय जाहीर करण्यात आला आहे. श्री गुरु रविदास जयंतीच्या कारणामुळे ही निवडणूक पुढे ढकलले गेल्याचे समजते. निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारीच्या दिवशी पंजाबमध्ये (Punjab Election In One Slot) एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र आता २० फेब्रुवारीपर्यंत पंजाबमधील मतदान पुढे ढकलण्यात आले आहे.
[read_also content=”हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला आहे खास महत्त्व, या दिवशी ‘अशी’ करावी पूजा https://www.navarashtra.com/religion/religion/paush-purnima-2022-imprtance-of-paush-purnima-nrsr-223708.html”]
१६ फेब्रुवारीला गुरु रविदास यांची जयंती असल्याने, पंजाबातून लाखो श्रद्धाळू गुरु रलिदास यांच्या जन्मस्थानी दर्शनासाठी जातात. उत्तरप्रदेशात बनारसमध्ये हे स्थान आहे. १६ तारखेच्या कार्यक्रमासाठी १३ तारखेपासूनच पंजाबमधून लाखो जण उत्तर प्रदेशात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनीही ही तारीख पुढे ढकलण्याच्या मागणीला सहमती दर्शवली आहे. या काळात सुमारे २० लाख लोकसंख्येची मते निवडणुकीत पडणार नाहीत, अशी शक्यता आहे.
असे झाल्यास काय, यामुळे निवडणूक आयोगाची काळजीही वाढली आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीही होईल. त्यामुळे पंजाबच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून याची माहिती आयोगाला दिली असून, आता याबाबत दिल्लीच्या निवडणूक आयोगाच्या मुख्यालयातून निर्णय झाला आहे.
१४ तारखेला मतदान, १३ पासूनच जाणार भाविक
पंजाबमध्ये ३२ टक्के अनुसूचित जातीचे बांधव राहतात. १६ फेब्रुवारीला गुरु रविदास यांची ६४५वी जयंती आहे. त्यांच्या दर्शनासाठी लाखो जण पंजाबमधून त्यांचे जन्मस्थान असलेल्या गोवर्धनपूरला जातात. ज्या भाविकांना जायचे आहे ते १३ आणि १४ तारखेला विशेष रेल्वेने रवाना होणार आहेत. उ. प्रदेशात गेल्यावर १६ तारखेच्या नंतर एक-दोन दिवसांनी हे भाविक परततील. अशा स्थितीत १४ फेब्रुवारीला मतदान घेतल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो.
राजकीय पक्षांची पत्रे आणि आता समुदायाकडूनही विरोध
पंजाबच्या निवडणुकांची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी पहिल्यांदा बसपाने केली. बसपाचे पंजाबचे प्रमुख जसबीर गढी यांनी २० तारखेला मतदान करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नीही यांनीही पत्र लिहिले. परिस्थिती पाहता भाजपा, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि शिरोमणी अकाली दलानेही निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
पंजाबच्या दाओबात विशेष करुन जालंधरमध्ये गुरु रविदास यांचे अनेक अनुयायी आहेत. त्यांनीही निवडणूकीच्या तारखांना विरोओध केला आहे. मतदान हा लोकशाहीचा महत्त्वाचा टप्पा आहे, मात्र आयोगाच्या दूरदृष्टीपणाच्या अभावामुळे अनेक जण या मतदानाला मुकतील, असे सांगण्यात येते आहे. त्यामुळे पंजाबात निवडणुका आठवड्याने पुढे ढकलण्याच्या मागणीने जोर धरला आहे.