नाटक या माध्यमावर माझा प्रचंड विश्वास आहे. मराठी प्रेक्षक जोपर्यंत आहे, तोपर्यंत नाटक जिवंत आहे. कुठल्याही क्षेत्राला चढीचा किंवा उतरता काळ असतो. नाटकालाही तो येऊन जातो, पण नाटक हा व्यवसाय कधीही ठप्प होणारा किंवा पूर्णपणे बंद होणारा नाही. कारण मराठी रसिकांना जीवंत मनोरंजनाची, प्रत्यक्ष कलाकृती पाहण्याची आवड आहे. त्यामुळंच नाटक कायम चालू राहणार असा माझा विश्वास आहे. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचा विषय नेव्हर एंडींग आहे. संसारामध्ये गर्लफ्रेंड-बॅायफ्रेंड असताना, दोन भावांमध्ये किंवा दोन बहिणींमध्ये, मित्र-मित्रांमध्ये ‘तू म्हणशील तसं’ हा खरं तर एक खूप आयुर्वेदिक फंडा आहे. जो आपल्याला रिलीफ देतोच. म्हणजे ‘तू म्हणशील तसं’ असं म्हटल्यावर पुढं काही घडायची शक्यता राहात नाही. या नाटकाचा विषय पूर्णपणे नवरा-बायकोचा आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्याची गोष्ट आहे. सध्याचा जो धकाधकीचा काळ आहे, आपलं जे लाईफस्टाईल आहे, आपलं जे कामाचं स्वरूप, ठिकाण कसं मॅरेज लाईफवर इफेक्ट करतं आणि त्यातून काय घडतं हे सांगणारी गोष्ट नाटकात आहे. अशा वेळेला ‘तू म्हणशील तसं’ असं म्हणून प्रसंग पुढे नेणं हे किती महत्त्वाचं आहे ते आमच्या नाटकात दाखवण्यात आलं आहे.
तारेवरच्या कसरतीची एन्जॅायमेंट
एकाच वेळी मालिका आणि नाटकांमध्ये काम करण्याचा प्रकार मी मागील बऱ्याच वर्षांपासून करत आलो आहे. विनय आपटेंसोबत जेव्हा ‘लोभ असावा ही विनंती’ हे नाटक करत असताना ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही मालिका सुरू होती. ‘मला सासू हवी’ या मालिकेत काम करताना ‘वैशाली कॅाटेज’ हे नाटक सुरू होतं. ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक करताना ‘देवाशपथ’ या मालिकेत काम करत होतो. त्यामुळं मालिका आणि नाटकांमध्ये एकाच वेळी काम करण्याचं समीकरण मी आधीपासूनच जुळवत आलेलो आहे. फक्त आता फरक असा आहे की इथं कलाकारांची फळी तगडी आहे. श्रेयस तळपदे, मोहन जोशी, प्रार्थना बेहरे यांच्या तारखांनुसार मला जुळवून काम करावं लागतं. माझ्या तारखा मी फार देऊ शकत नाही. त्यामुळं थोडी तारेवरची कसरत होते. याखेरीज मालिकेच्या लिखाणाचं काम करत असल्यानं त्यांच्या मिटिंग्जलाही जावं लागतं. हे करताना थोडीशी त्रेधा तिरपीट उडते, पण मला असं वाटतं की कलाकार म्हणून आपण बिझी असावं यासाठीच आम्ही संघर्ष करत असतो. त्यामुळं बिझी असणं आणि तारेवरची कसरत करणं मी खूप एन्जॅाय करतोय आणि त्याची मजा येतेय.
दामलेंच्या ग्लॅमरची साथ
प्रशांत दामले यांनी जितकी मराठी रंगभूमी अनुभवली तेवढी आज तरी मराठी सिने-नाट्यसृष्टीत कोणीही अनुभवलेली नाही. १४ हजार प्रयोग केलेले आहेत. प्रशांत दामले फॅन क्लबचं बॅनर जोडीला असणं म्हणजे सोन्याहून पिवळं. मी त्यांना मागे एकदा म्हणालो होतो की, तुम्ही वाढलेलं ताट माझ्यासमोर आणून ठेवलं आहे. आता फक्त मला ते व्यवस्थित चाटून फुसून खायचं आहे. कारण प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचा ऑलरेडी ऑडीयन्सचा एक बेस आहे, जो खूप निखळ मनोरंजनासाठी येतो. कमरेखालचे कुठलेही विनोद नाहीत याची खात्री असल्यानं येतो. मला फक्त नाटकाचा लेखक आणि अभिनेता म्हणून तो दर्जा मेंटेन करायचा आहे.
पुण्याई आणि प्रामाणिकपणा
आता जे स्ट्रगल ऑडीयन्स आणण्याचं नसून, रसिक टिकवण्याचं आहे. त्यासाठी आम्ही उत्तम परफॅार्मंस करतोय. रसिकही उत्साहानं येत असल्यानं बुकींगही जबरदस्त होऊ लागलं आहे. बोरिवलीमध्ये झालेल्या प्रयोगला दीड लाखांपेक्षा जास्त बुकींग होतं. काशिनाथमध्ये रंगलेल्या प्रयोगानं दोन लाखांची मजल मारली. त्यामुळं ही प्रशांत दामले यांच्या नावाची पुण्याई आणि प्रयोग सादर करताना आम्ही केलेला प्रामाणिक अभिनय या सर्वांचा तो परीपाक आहे.
लव्हेबल केमिस्ट्री
भक्ती देसाई ही खूप अनुभवी असल्यानं तिच्यासोबत काम करताना कही प्रश्नच येत नाही. तिनं आतापर्यंत बऱ्याच व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलेलं आहे. दामलेंच्या भाषेत बोलायचं तर ती नाटकवाली आहे. त्यामुळं नाटकाच्या काय कमिटमेंट्स असू शकतात, किती वेळ द्यावा लागतो हे सगळं तिला माहित आहे. तिच्यासोबत काम करायला मजा येते. आजच्या काळातील मुलीचं प्रतिनिधीत्व करणारा तिचा रोल असल्यानं आणि मी देखील आताच्या काळातील लव्हेबल मुलगा करत असल्यानं ते सादर करायला मजा येते. लिखाणातही तसंच असल्यानं आमचीही केमिस्ट्री वर्क होतेय. छान परफॅार्मन्स होत असल्याचं आम्हाला रसिक प्रत्येक प्रयोगानंतर सांगत आहेत.
१०० टक्के मनोरंजनाची खात्री
यात मी गौरव नावाचा तरुण साकारत आहे. याच्या पत्नीचं नाव अदिती आहे. एकाच क्षेत्रात काम करणारं आणि दीड वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेलं हे जोडपं आहे. संसार आणि काम करता-करता त्यांची कशा प्रकारे तारेवरची कसरत सुरू असते आणि कधी-कुठे-कसं-कोणाला तू म्हणशील तसं म्हणावं लागतं हा या नाटकाचा गाभा आहे. रसिकांना मी इतकंच सांगू इच्छितो की, तुम्हाला तुमच्या घरातील गोष्ट यात दिसेल. तुमच्या घरातील संवाद ऐकू येतील. तुमच्या घरातील वागणूक दिसेल. नोकरी आणि काम करत असताना आपण आपल्यातील माणूसपण जर जिवंत ठेवलं, तर सर्वांचा स्ट्रेस येत नाही. प्रशांत दामले फाऊंडेशननं हेच जपलं आहे. आम्ही तीन-चारशे रुपये घेऊन कुठलाही डोस पाजत नाही. आम्ही तुमचं मनोरंजन करतो. तुम्ही ऑलरेडी स्ट्रेस लाईफ जगत असल्यानं या तीन तासांमध्ये तुमचं १०० टक्के मनोरंजन होईल याची खात्री आम्ही देतो. हे नाटक पाहताना नवऱ्याला किंवा बायकोला एकमेकांना कोपरखळीही मारावीशी वाटेल. यात मी एक लाईव्ह गाणंही परफॅार्म करताना गातो. हा निखळ आनंद उपभोगण्यासाठी रसिकांनी यावं आणि म्हणावं, ‘तू म्हणशील तसं’.
बदलत्या सेटची जादू
नाटकाचा सेट प्रदीप मुळ्ये यांनी तयार केला आहे. यात एक गंमत केली आहे. या नाटकामध्ये चालू प्रयोगातच सेट बदलतो. आमच्या नाटकात ब्लॅक आऊट नाहीय. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांमधील दोन्ही अंकांमध्ये ब्लॅक आऊट नाही. पडदा उघडल्यावर अख्खा पहिला अंक घडतो. सेट प्रेक्षकांसमोरच चेंज होतो. दुसऱ्या अंकात पडदा बंद झाला की सेट बदलतो. मुळ्ये यांनी अर्थातच सेट इतका लवचिक बनवला आहे की अगदी सहजपणे तो बदलला जातो. अशोक पत्की काकांचं म्युझिक आहे. त्यामुळं या नाटकाला चार चांद लागलेले आहेत.