प्रतिकात्मक फोटो
मुंबई (Mumbai). एका महिलेचा मेंदू मृत झाल्याने तिचे प्राण गेले; मात्र, तिच्या अवयवांनी तिघांना जीवनदान दिले. कारण, मृत्यूपूर्वी त्या महिलेचे यकृत, मूत्रपिंड आणि डोळे तिने गरजूंना दान करण्याची इच्छा व्यक्त केली. या अवयवांच्या प्रत्यारोपणातून तिघांचे प्राण वाचले.
मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने त्या महिलेवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ३ नोव्हेंबरला ती मेंदूमृत झाल्याचे घोषित करण्यात आले. मेंदूमृत झाल्यावर रुग्णालयातील डॉ. सुधीर आंबेकर, इंटेव्हिस्ट डॉ. इंद्रनील आणि मेडिलक सोशल वर्कर यांनी महिलेच्या नातेवाईकांसोबत अवयवदानाबाबत चर्चा केली. मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्यात यावे अशी त्या मेंदू मृत्यू झालेल्या महिलेची इच्छा असल्याचे तीच्या कुटुंबियानी सांगितले. आपली आई सुहृदयी होती. ती स्वत:पेक्षा कुटुंबातील नागरिक आणि अन्य नातेवाईकांना प्राधान्य देत असे.
आम्ही तिची मुले असून तिने शिकवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत. जेव्हा माझे निधन होईल, तेव्हा माझे अवयवदान करा असे ती नेहमी सांगत असल्याचे अवयवदात्री महिलेच्या मुलांनी सांगितले. त्यामुळे मुलांनी व महिलेच्या पतीने डॉक्टरांकडे अवयवदानाच्या प्रक्रियेबाबत विचारणा केली. त्या महिलेचे डोळे, यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आले. जरी आईला वाचवू शकलो नसलो तरीही तिचे अवयवदान करून तिला जिवंत ठेवले. त्यामुळे तिचे अवयवदान समाजासाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा कुटुंबीयांनी व्यक्त केली.
जसलोक रुग्णालयाचे सीईओ जीतेंद्र हरयाण, वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद खाडके यांनी डॉक्टरांच्या टीमला सहकार्य करत त्यांना अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली. मेंदूमृत महिलेच्या कुटुंबियांचा निर्णय कौतुकास्पद आहे. रुग्णाने स्वत: आपले अवयवदान करण्याची इच्छा कुटुंबाकडे व्यक्त केली होती हे त्यापेक्षाही कौतुकास्पद आहे. अवयवदान मानवतादी असून अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देण्याची सध्या नितांत गरज असल्याचे झोनल ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेशन सेंटरचे (झेडटीसीसी) जनरल सेक्रेटरी डॉ. भरत शाह यांनी सांगितले.






