(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Solapur News: करमाळा तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पेरणी होऊन दीड ते दोन महिने उलटले आहेत. सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस नसतानाही शेतकऱ्यांनी उसनवारी करून खते, बियाणे आणि कीटकनाशके खरेदी करत पेरणी केली. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत.
सुरुवातीला काही भागांत रिमझिम पाऊस झाल्याने सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर या पिकांनी चांगली उभारी घेतली होती. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.
एखाद्या नक्षत्रात तरी दमदार पाऊस होऊन पिकांना जीवदान मिळेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, दिवसेंदिवस पावसाची प्रतीक्षा वाढत असल्याने ही आशाही आता मावळू लागली आहे. खरीप हंगामातील उत्पन्नावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे.
खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या वाढत्या दरामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यात मजुरी, ट्रॅक्टर, मशागत तसेच अन्य यंत्रसामग्रीच्या खर्चाची भर पडली आहे. हजारो रुपये खर्च करून पिकांची लागवड केली असताना आता पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत.
खर्च दिवसेंदिवस वाढत असताना उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसल्याने “शेती करायची तरी कशी?” असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीच्या मशागतीसाठी हजारो रुपये खर्च करूनही शेती परवडत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. सध्या पावसाचा थांगपत्ता नसल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत.
“पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतीच्या मशागतीसाठी हजारो रुपये खर्च करूनही शेती परवडत नाही. सध्या पावसाचा थांगपत्ता नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खरीप पिके हातातून गेल्यास कर्जाची परतफेड, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि आगामी रब्बी हंगामाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. खरीप हंगामावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक गणित पावसाअभावी बिघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटाचे पडसाद ग्रामीण बाजारपेठेवरही उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील पैसा कमी झाल्याने ग्रामीण अर्थचक्रावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






