चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
महिला आरक्षण विधेयक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘चहावाला’ प्रवास, रॅपिडोमुळे संकटात आलेले रिक्षाचालक, अमरावती रुग्णालयातील दुर्घटना आणि शाळांच्या आंदोलनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील घडामोडींचा अभ्यास करून वस्तुस्थिती समजून घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले की, “नरेंद्र मोदी ज्या काळात ज्या रेल्वेस्टेशनवर चहा विकत होते असा दावा करतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्त्वातच नव्हते, १९७१ सालच्या आसपास ते गुजरातमध्ये ते रेल्वेस्टेशन अस्तित्त्वात नव्हते. त्यांनी चहावगैरे विकला नाही. देवेंद्र फडणवीस परत खोटे बोलत आहेत. मोदींनी लहानपणी चहा विकला नाही. कुणी मला मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा पुरावा आणून दिला तर मी राजकारणच सोडेन, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.
मोदी स्वत:ला नॉनबायोलॉजिकल म्हणवतात. मग जे आईच्या गर्भातून आलेले नाहीत ते शाळेत कसे जातील, चहा कसे विकतील. मोदी ज्या स्टेशनचा उल्लेख करतात त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्त्वातच नव्हते.’ असही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
या देशातील अनेक राज्यकर्ते सामान्य कुटुबातून आले आहेत. आपण नगरसेवक होऊ, मुख्यमंत्री होऊ असे कधीही मला वाटले नव्हते, असे फडणवीस म्हणत असतील तर त्यांनी सदैव या महाराष्ट्राचे कायम आभारी असायला हवे. पण तुम्ही या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालात. धर्मा-धर्मात, जातीत भेद करायला निघालात, खोटं बोलत आहा, सुडाने, द्वेषाने वागत आहात, जो माणूस समान्य घरातून जन्माला येतो तो असे वागत नाही, असा टोलाही संजय राऊतांनी फडणवीस यांना लगावला.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राऊतांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. 2023 मध्ये संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील संविधान (106वी दुरुस्ती) अधिनियम मंजूर झाला होता. या कायद्यात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षणाची तरतूद करण्यात आली; मात्र त्याची अंमलबजावणी जनगणना आणि त्यानंतरच्या मतदारसंघ पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) जोडण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राऊतांनी फडणवीस यांच्या 2023 मधील भूमिकेचा संदर्भ देत सवाल केला. “2023 सालचे विधेयक पुन्हा आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? एकच विधेयक दोनदा कसे जाहीर होणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या विधेयकाच्या अंमलबजावणीऐवजी त्यात डिलिमिटेशनचा मुद्दा जोडला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर महिला आरक्षणाच्या भूमिकेवरून टीका केली आहे. महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याचा त्यांचा आरोप आहे.
रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या अॅप-आधारित प्रवासी सेवांमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दा राऊतांनी उपस्थित केला. “ आपल्या राज्यात हजारो रिक्षाचालक मराठी आहेत. ज्यांना कधीही नगरसेवक किंवा मुख्यमंत्री होता येणार नाही, असे हजारो मराठी रिक्षाचालक आहेत. अशा रिक्षाचालकांचे रॅपिडो बाईक रिक्षामुळे व्यवसाय संकटात आले आहेत, तेही मराठीच आहेत ना. या प्रकरणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिल्याचे सांगितले. रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच अशा सेवांना परवानगी देण्याची भूमिका राऊतांनी मांडली आहे.






