एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावले तब्बल 45000 कोटी रुपये!
मागील आठवड्यात शेअर बाजारात बरेच चढ-उतार दिसून आले. मात्र, पडझडीमध्ये देखील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे. सेन्सेक्सच्या कमाईमधील सर्वात मोठी कंपनी म्हणून एलआयसीने स्थान पटकावले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एलआयसी या कंपनीचे एकूण बाजार मूल्य (मार्केट कॅप) 7,46,602.73 कोटी रुपये इतके झाले आहे. ज्यात मागील पाच दिवसांत 44,907.49 कोटींची वाढ नोंदवली गेली आहे. एलआयसीचा शेअर शुक्रवारी (ता.२६) 2.51 टक्क्यांनी वाढून 1190 रुपयांवर बंद झाला आहे.
‘या’ कंपन्यांकडूनही गुंतवणूकदारांना मोठा नफा
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शेअरव्यतिरिक्त ज्या कंपन्यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. त्यामध्ये टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस दुसऱ्या स्थानावर आहे. इन्फोसिसचे बाजार मूल्य 35,665.92 कोटी रुपयांनी वाढून, 7,80,062.35 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यासह आयटीसीचे बाजार मूल्य चालू आठवड्यात 35,363.32 कोटींनी वाढून 6,28,042.62 कोटीपर्यंत वाढले आहे. तर टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार मूल्य चालू आठवड्यात 30,826.1 कोटींनी वाढून, 15,87,598.71 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
हेही वाचा : …फेसबुक खरेदी करणार ‘ही’ कंपनी; मार्क झुकरबर्ग उतरणार ‘या’ उद्योगामध्ये!
‘या’ कंपन्यांच्याही बाजार मूल्यात वाढ
दरम्यान, दूरसंचार कंपनी भारती एअरटेल गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदारांच्या कमाईच्या बाबतीत आघाडीवर राहिली आहे. भारती एअरटेलचे बाजारमूल्य 30,282.99 कोटींनी वाढून, 8,62,211.38 कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे. याशिवाय खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य चालू आठवड्यात 8,140.69 कोटींनी वाढून, 12,30,842.03 कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.
रिलायन्सचे गुंतवणूकदार घाट्यात
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या आठवड्यात मोठा घाटा सहन करावा लागला आहे. रिलायन्स कंपनीच्या बाजार मूल्यात 62,008.68 कोटींची घसरण होऊन, ते 20,41,821.06 कोटी रुपयांपर्यंत खाली घसरले आहे. तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 28,511.07 कोटींनी घसरून, 8,50,020.53 कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. तर एसबीआय बँकेचे बाजार मूल्य चालू आठवड्यात 23,427.1 कोटींनी घसरून, 7,70,149.39 कोटी झाले आहे.