सांगली – ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या (Infosys Foundation) प्रमुख तथा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या सासू सुधा मूर्ती (Sudha Murty) यांनी सोमवारी सांगलीमध्ये (Sangli) शिवप्रतिष्ठान संघटनेचे (Shiv Pratishthan) अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सुधा मूर्ती यांनी भिडे यांच्या पाया पडल्याचेही दिसून आले. सध्या संभाजी भिडे हे त्यांच्या टिकलीसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. मात्र, सुधा मूर्ती आणि भिडे यांच्यामध्ये चार ते पाच मिनिटे चर्चा झाली.
एका कार्यक्रमानिमित्त सूधा मूर्ती भावे नाट्यगृहामध्ये आल्या होत्या. त्याचवेळी तिथे संभाजी भिडेही आले होते. तेव्हा नाट्यगृहाच्या आवारामध्ये या दोघांची भेट झाली. संभाजी भिडे भेटल्यानंतर सुधा मूर्ती त्यांच्या पाया पडल्या. त्यानंतर दोघांनाही खुर्च्यांवरुन काही वेळ गप्पा मारल्या. अशाप्रकारे सुधा मूर्ती यांनी एखाद्या व्यक्तीच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
काही आठवड्यांपूर्वी सुधा मूर्तींचा एका महिलेच्या पाया पडत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुधा मूर्ती या मैसूरच्या राजघराण्यातील सदस्या असलेल्या प्रमिला देवी वाडियार यांच्या पाया पडत असल्याचा २०१९ चा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत होता. सुधा मूर्ती यांनी नृसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतले. त्यानंतर त्यांचे बालपण गेलेल्या कुरुंदवाड येथील घरीही गेल्या होत्या.