संग्रहित फोटो
मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दारूच्या नशेत एका ४० वर्षीय ऊसतोड कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे आज (दि.२९) दुपारी एकच्या सुमारास घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण किसनराव सुरोसे (रा. साकत पिंपरी ता. पुसद, यवतमाळ) हे पत्नीसह ऊसतोडीच्या टोळीमध्ये मोहोळ तालुक्यातील भोयरे गावच्या हद्दीत ऊस तोडण्यासाठी आले होते. बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान ऊसतोड कामगार लक्ष्मण सुरोसे व त्यांची पत्नी बबिता या दोघांमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान दुपारी एकच्या सुमारास लक्ष्मण सुरोसे याने दारूच्या नशेत लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत ऊस तोडीचे वाहन मालक उल्हास राऊत यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली असून, त्यानुसार मोहोळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पोफळे करीत आहेत.