टेंभुर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : टेंभुर्णी येथील आण्णा भाऊ साठेनगरमधील मातंग समाजातील महिला व पुरुषांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढून टेंभुर्णी पोलिस वसाहतीतील मानवी विष्ठा व मैला हाताने साफ करावयास भाग पाडल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व अन्य पोलिस कर्मचारी यांच्यावर वारंवार मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे पीडित तरुण राम लक्ष्मण आरडे (रा.टेंभुर्णी ता.माढा) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत वरील पोलिस व त्यांचे सहकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस अधिकारी यांचेवरही गुन्हा दाखल व्हावा, यासाठी अॅड. आसावरी खांडकर यांच्यातर्फे याचिका दाखल केली आहे.
टेंभुर्णी शहरातील पोलीस स्टेशन लगत असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर येथील मातंग समाजातील महिलांना मुलांना राहत्या घरी जाऊन धक्काबुक्की करत आहे. या अवस्थेत घराबाहेर ढकलत आणून टेंभुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्र यांनी २९ मे २०२१ रोजी दुपारी बाराच्या सुमारास वीस ते पंचवीस पोलीस कर्मचाऱ्याच्या सहाय्याने पोलीस स्टेशन आवारातील ती घाण तुम्हीच टाकलेली आहे आणि ते तुम्हीच उचला असे म्हणत जवळपास ५० महिला व लहान मुले यांना शिवीगाळ करून त्यांना संपूर्ण कचरा, घाण, गटारी संडास, माणसांची व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली.
महिलांनी कचरा साफ करण्यास नकार देताच राजेंद्र राजकुमार केंद्रे यांनी अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काठीने, पट्ट्याने मारहाण करण्यात येईल, असा धाक दाखवून त्यांच्याकडून पोलीस स्टेशन परिसरातील संपूर्ण कचरा व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ दादागिरी करून पोलीस स्टेशन आवारातील घाण काढायला लावली, असा आरोप करीत दलित समाजाने व संघटनांनी केेंद्रे यांच्यासह वरील पोलिस कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणे, मोर्चा काढण्यात आला होता. याची सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दखल घेत केंद्रे यांची उचलबांगडी करीत पदभार काढून घेतला होता.