नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आहे. भारताने दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. दुसऱ्या सराव सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ८१ धावांनी पराभव केला. यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा २ धावांनी पराभव केला होता.
दुसऱ्या सराव सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २५८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ९ गडी गमावून १७७ धावाच करू शकला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघासाठी सलामीवीर स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक केले. स्मृतीने ६७ चेंडूत सात चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या, तर दीप्तीने एका चौकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या. दोघांमध्ये ११७ धावांची भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सराव सामन्यात डोक्याला मार लागल्याने स्मृतीला फलंदाजी अर्धवट सोडावी लागली. अशा स्थितीत दुसऱ्या सराव सामन्यात त्याची शानदार फलंदाजी भारतीय संघाला दिलासा देणारी होती. दीप्ती आणि स्मृतीशिवाय यास्तिका भाटियाने ४२ आणि कर्णधार मिताली राजने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३० धावा केल्या.
वेस्ट इंडिजच्या ४ बाद ५३ धावा झाल्या
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ सामन्यात दिसला नाही. झंझावाती फलंदाज डायंड्रा डॉटिन अवघी एक धाव काढून परतली. त्याचबरोबर झुलन गोस्वामी आणि मेघना सिंग यांनी सुरुवातीपासूनच विंडीज संघावर दडपण ठेवले. वेस्ट इंडिजने ३ षटकांत केवळ १ धावा केल्या.
वेस्ट इंडिजच्या ४ विकेट ५३ धावांवर पडल्या. हेली मॅथ्यूज (४४) आणि शेमन कॅम्पबेल (६३) यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी झाली. मेघना सिंगने मॅथ्यूजला बाद करून ही जोडी फोडली.