Glenn Maxwell (Photo Credit- X)
AUS vs SA 3rd T20I: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यातील तीन टी२० सामन्यांची मालिका आता ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली आहे. केर्न्समध्ये झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने विजय मिळवत मालिका नावावर केली. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र १२२ धावांत ६ विकेट्स गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला होता. अशा कठीण परिस्थितीत, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) मैदानात आला आणि त्यांनी एक बाजू सांभाळत संघाला विजयाच्या दिशेने नेले. मॅक्सवेलने ३६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने १९.५ ओव्हर्समध्ये विजय मिळवला.
GLENN MAXWELL WINS IT ON THE SECOND LAST BALL!#AUSvSA pic.twitter.com/gvrzvyHnGc
— cricket.com.au (@cricketcomau) August 16, 2025
गेल्या काही काळापासून आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करत असलेल्या मॅक्सवेलने या सामन्यात पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले. ६२ धावांच्या या दमदार खेळीसह, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजयी ठरलेल्या सामन्यांत २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्या आधी डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याच्या नावावर २२३७ धावा आहेत. मॅक्सवेल सध्या जागतिक यादीत १०व्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातील मॅच-विनिंग कामगिरीमुळे मॅक्सवेलला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब मिळाला. हा त्याचा टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १२वा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार होता. यासह, तो ऑस्ट्रेलियासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नरच्या बरोबरीने पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
डेव्हिड वॉर्नर – १२
ग्लेन मॅक्सवेल – १२
शेन वॉटसन – ९
अॅडम झम्पा – ८
अॅरॉन फिंच – ८
तिसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत गोलंदाजीता निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट गमावून कांगारुसमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेविसने ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर, कर्णधार मिशेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करताना झटपट सुरुवात केली. त्याने ३७ चेंडूत ५४ धावा केल्या आणि संघाला ६६ धावांची सलामी दिली. पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाचे चार बळी घेतले आणि धावसंख्या ८८/४ झाली. येथून सामना पूर्णपणे रोमांचक वळणावर पोहोचला.
दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने येताच सामन्याचे चित्र उलगडले. त्याने खालच्या फळीसोबत भागीदारी करताना स्फोटक फलंदाजी केली आणि २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने शेवटच्या षटकात १ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. मॅक्सवेलने शानदार रिव्हर्स शॉटसह विजयी धावा काढल्या आणि नाबाद ६२* धावा (३६ चेंडू) करत संघाला २ विकेटने विजय मिळवून दिला.