इस्लामपूर / विनोद मोहिते : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी युक्रेनमध्ये तीन महिन्यापूर्वीच दाखल झालो. परदेशात संधी मिळाल्याचा आनंद घेऊन वैद्यकीय शिक्षणाचा पहिले पाऊल टाकलं. मात्र, युक्रेन आणि रशियाच्या युद्धजन्य परिस्थितीचा थरारक अनुभव घेतला. दोघीं बहिणींची ताटातुट झाली. नऊ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भारतात घरी परतलो. घरी सुखरूप परत आल्याचा आनंद या दोघींच्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. हा प्रसंग घडला वाटेगाव तालुका वाळवा येथे.
परदेशात मुलींना शिक्षणाची संधी मिळाल्याने आनंदी असणारे शेटे कुटुंबातील सदस्य गेल्या दहा-बारा दिवसांत चिंताग्रस्त होते. हे आज खुश झाले.
युक्रेनमधुन परतत असतानाचे अनुभव सांगताना श्रध्दा महावीर शेटे म्हणाल्या, आम्हाला युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाऊन अवघे तीन महिने झाले होते. युक्रेनमध्ये बुकोविनियन स्टेट मेडीकल विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी निवड झाली होती.
चर्णीवस्ती येथे होस्टेलमध्ये रहात होतो. अभ्यासक्रमाची सुरवात झाली होती. तोच भारतीय दुतावासाकडून रशिया व युक्रेन युद्धाबाबतची व्हॉट्सअॅप वर नोटिस आली. आम्ही भारतात येण्यासाठीची २५ फेब्रुवारीची दोघींची तिकीटे बुक केली.
२३ फेब्रुवारीला आम्ही दोघी बहिणी ५२० किलोमीटरवर असणाऱ्या किव्ह विमानतळावर येत असताना विमानतळापासून २० किलोमीटर लांब असताना विमानतळावर बॉम्ब हल्ला झाल्याची बातमी टॅक्सीमध्येच प्रवासात दुतावासाकडून व्हॉट्सअॅपवर समजली. आम्ही सर्वजण भयभीत झालो. गावाकडून आई, वडील व कुटुंबातील सर्वांचे फोन वाजू लागले, वारंवार चौकशी होवू लागली.
परतीचा प्रवास म्हणजे काळरात्र होती. परतीच्या प्रवासात त्या हाडे गोठणाऱ्या थंडीत भयाण काळोखात ट्रॅफिक जाम झाल्याने बारा तासाने आमची टॅक्सी दहा किलोमीटर पुढे सरकली होती.
रशियाने सायबर हल्ला केल्याने आम्हाला फोनला नेट मिळत नव्हती. आम्हाला कोणासही संपर्क करता येत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ ला भारतीय दुतावासाकडून भारताकडे जाणाऱ्यांची लिस्ट आली. दुसऱ्या लिस्टमध्ये माझे (श्रध्दा) नाव तर तिसऱ्या लिस्टमध्ये बहिण साक्षीचे नाव होते. त्याचदिवशी रात्री १० वाजता युक्रेनची सिमा मी पार केली. रुमानियाला गेले. शनिवारी दुपारी ४ वाजता विमानाचे उड्डाण भारताकडे झाले. रविवारी पहाटे ३ वाजता (श्रध्दा ) दिल्लीला विमान पोहोचली. तर साक्षी मंगळवारी १मार्च रोजी पहाटे ३ वाजता दिल्लीत पोहचली. बुधवार २ मार्चला १ वाजता पुणे येथे पोहचली.
१० किलोमीटर पायी प्रवास ..!
साक्षी शेटे म्हणाली ,” युक्रेन मधील चर्णीवस्ती येथुन रुमानिया बॉर्डरपर्यंत बसने प्रवास केला. तर रुमानिया बॉर्डरपासून युक्रेनकडील बाजूला १० किमी ट्रॅफिक जाम झाल्याने कडाक्याच्या (उणे ३ ते ४ तापमान) पायी प्रवास करत बॉर्डरवर पोहोचले.
बॉर्डरवर युक्रेनीयन नागरिक व विविध देशातील विद्यार्थी यांची प्रचंड मोठी गर्दी रुमानिया मध्ये जाण्यासाठी झाली होती. प्रत्येकजण रुमानिया मध्ये जाण्यासाठी धडपड करीत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जवानांनी हवेत गोळीबार केला. तेव्हा झालेल्या चेगरांचेगरीत साक्षीच्या पायाला दुखापत झाली. तशीच लंगंडत बॉर्डर पास केली व रुमानिया विमानतळावर पोहोचले. तेथुन मंगळवारी दिल्लीत बुधवारी पुण्यातून श्रध्दा व साक्षी दोघेही शुक्रवारी ११ वाजता वाटेगावला पोहोचले.
भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचे मोठे योगदान
भारत सरकारच्या प्रयत्नामुळे माझा व माझ्या कुटुंबाचा जीव का प्राण असलेल्या साक्षी व श्रध्दा या दोन्ही मुली वाटेगावपर्यंत घरी सुखरूप पोहोच केल्या. त्यामुळेच कुटुंबाला पहावयास मिळाल्या. यामध्ये भारत सरकारचे व महाराष्ट्र सरकारचे प्रचंड मोठे योगदान आहे. ग्रामस्थ व शेटे कुटुंबाच्या वतीने भारत सरकारचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.
– महावीर शेटे, वाटेगाव (ता वाळवा जि सांगली)