महाविकास आघाडीच्यावतीने पीक विमा रक्कम मिळण्यासाठी धरणे आंदोलन
भगवान लोके, कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्यावतीने हवामान आधारित आंबा काजू पिक विमा योजने बद्दल १ जुलै २०२४ रोजी विमा रक्कम मिळण्यासाठी मागणी करण्यात आली होती. वारंवार आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे किंवा कृषी अधीक्षक असतील वारंवार यांच्याशी चर्चा करून आंदोलनाच्या नोटिसा देऊनही अद्यापही विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे उद्या दिनांक ९ रोजी ठीक सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत यांनी दिली.
या आंदोलनात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या जिल्ह्यातील आंबा , काजू बागायतदार व शेतकरी यांनी उद्या प्रशासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित आंबा , काजू विमा रक्कम तात्काळ मिळण्यासाठी उद्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उद्या ११ वाजता ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित रहावे , असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने सतीश सावंत यांनी केले आहे.