‘सूर्यवंशी’ हा १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अक्षयचा जवळपास पंधरावा चित्रपट बनला आहे. असं असलं तरीही अक्षय म्हणतो की, मला आजही बरंच काही शिकायचं बाकी आहे. ‘सूर्यवंशी’ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानतो. यासोबतच सुरुवातीपासून आजतागायत कायम पाठिंबा दिल्यानं मीडिलाही धन्यवाद देतो. ‘बेलबॅाटम’मध्येही प्रयत्न केला होता, पण तो ४० कोटींपर्यंतच पोहोचू शकला. त्यावेळी सर्वच बंद होतं, तरीही प्रयत्न करणं गरजेचं होतं. त्यासाठी ‘सूर्यवंशी’साठी मी आणि रोहितनं मिळून प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश मिळाल्यानं आनंदी आहे.
स्टारडमबाबतच्या भावना व्यक्त करताना अक्षय म्हणाला की, मी स्टारडम मानत नाही. आजही मी कंटेंटलाच स्टार मानतो. माझ्यासाठी सर्वात मोठा स्टार लेखक आहे. मला असं वाटतं की, लेखक हेच खरे स्टार्स असून, तेच स्टार्सना घडवण्याचं काम करतात हे मुद्दाम नमूद करा. आम्हाला पहायला प्रेक्षक थिएटरमध्ये येतात, पण कथा पहायलाही येतातच. कथांवरच चित्रपटांचा बेस आधारित असतो. एखादी कथा कमर्शिअल असते, तर एखादी सत्य घटनांवर आधारित असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा असतात.
भविष्यात ‘अतरंगी’ येईल. ‘पृथ्वीराज’ येईल. ‘बंटी और बबली २’ येईल. हे चित्रपटही वेगवेगळ्या कथा सादर करतील. त्यामुळं लेखक खूप महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. लेखकानं जर चांगलं लिहीलं नाही, तर मी कॅमेऱ्यासमोर काय बोलणार… सलीम-जावेदसाहेबांसारख्या बऱ्याच लेखकांमुळं आज आम्ही आहोत. ‘सूर्यवंशी’मध्ये साकारलेला वीर नावं विसरतो. ते लोकांना आवडलं. हे देखील रायटरचं क्रेडीट आहे. मीसुद्धा कधी कधी नावं विसरतो, ही खरी गोष्ट आहे. रोहित आणि लेखकानं कदाचित तो पॅाईंट पकडला असावा. कित्येकदा मी नावं विसरतो, त्यामुळं कदाचित तिथूनच त्यांना ही कल्पना सुचली असावी.
माझ्या मतानुसार दोन प्रकारची भीती असते. एक चांगली आणि दुसरी वाईट… ज्याप्रकारे आपल्या बॅाडीमध्ये गुड कोलेस्ट्रॅाल आणि बॅड कोलेस्ट्रॅाल असतात, त्याप्रमाणे गुड फिअर आणि बॅड फिअर आपल्या मनात असते. उदाहरण द्यायचं तर आता या टेबलावरून मला जर खाली उडी मारायची असेल, तर माझा फिअर मला सांगेल की आय शूड चेक… इथं सर्व ठीक आहे ना. जमिनीवर पाणी तर पडलेलं नाही ना. एखादी अशी वस्तू नाही ना ज्यावरून मी घसरेन. हा माझा गुड फिअर आहे. ही देखील भीती आहे, पण ती चांगली आहे. ही भीती माझ्या स्वत:च्या सेफ्टीसाठी असते. काहीही माहित नसताना तुम्ही घाबरता तो बॅड फिअर आहे. तुम्ही तुमचे स्टंटस केले पाहिजेत, पण गुड फिअरसोबत. मला भीती वाटतेय, पण मला चेक करू द्या, मी करेन. यात हेलिकॅाप्टरचा स्टंट करतानाही मी अशा प्रकारची काळजी घेतली. माझा होल्ड बरोबर राहील. पायलटसोबत चर्चा करून तो किती वेळ घेणार हे विचारून घेतलं. हेलिकॅाप्टरच्या दृश्यामध्ये मला सेफ्टी जाणवली म्हणून केला. दोन ते अडीच मिनिटांपर्यंत मी हेलिकॅाप्टरच्या ग्रीपवर हात पकडून ठेवू शकतो याची खात्री केल्यानंतरच तो सीन केला. सर्व गोष्टी कॅलक्युलेट केलेल्या होत्या. हा गुड फिअर आहे. माझ्यातही फिअर आहे. कुटुंबासमोर मी गिव्ह अप केलं असल्यानं ते कधीही स्टंटससाठी अडवत नाहीत.
प्रेक्षक जेव्हा कौतुक करतात आणि माझा चित्रपट त्यांना आवडतो, तेव्हा मी खऱ्या अर्थानं आनंदी होतो. जेव्हा निर्माते मला त्यांच्या पुढल्या चित्रपटासाठी साईन करायचं असल्याचं सांगतात, तेव्हा मला आनंद होतो. बॅाक्स आॅफिसचं प्रेशर माझ्यावरही असतं. कसं होईल, काय होईल, यानंतर मोठा चित्रपट बनवू शकू की नाही या सर्व गोष्टींची चिंता मलाही सतावते. निर्मात्यांनी पैसे लावलेले असल्यानं प्रेशर तर असतंच. राईट फिल्म निडवण्याचं प्रेशर नक्कीच असतं. मी माझ्या कोणत्याही चित्रपटासाठी लेखक-दिग्दर्शकांसोबत खूप चर्चा करतो. एका चित्रपटासाठी केवळ बसून विचार विनिमय करण्यासाठी माझे जवळपास १० ते १२ दिवस जातात. पटकथेवर चर्चा करण्यासाठी पहाटे ४-५ वाजता ते लोकं येतात आणि मी त्यांच्यासोबत चर्चा करत असतो.
रोहितला मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ज्यावेळी तो कुकू कोहलींना असिस्ट करायचा, तेव्हापासून आमची खूप चांगली ओळख आहे. कुकू कोहली यांच्यासोबत मी चित्रपट केले आहेत. त्यावेळी रोहित मला शॅाटसाठी बोलवायचा. तो क्लॅपही द्यायचा. त्या वेळेपासून माझी रोहितशी ओळख होती, पण आता त्याला मी खूप मेहनती माणूस म्हणून ओळखतोय. तो नेहमीच कठोर परिश्रम घेतो आणि इतरांकडून करूनही घेतो. रोहित जेव्हा असिस्टंट होता तेव्हाही हार्ड वर्क करायचा आणि आताही करतोय. अजूनही तसाच आहे. शूटिंग सुरू असताना मी त्याला केव्हाच खुर्चीत बसल्याचं पाहिलेलं आठवत नाही. शूटिंग सुरू असताना तो कायम उभा राहून स्वत:चं काम करत असतो. फार कमी दिग्दर्शक आहेत जे उभे राहतात आणि आपलं काम करतात. त्यांच्यापैकी रोहितही एक आहे.
एखादा पोलीस कर्तव्य बजावताना शहीद होतो, तेव्हा त्याच्या पत्नीवर कशा प्रकारे संकट कोसळतं ते ‘सूर्यवंशी’मध्ये पहायला मिळतं. त्या पोलिसाची पत्नी आपल्या मनातील भावना व्यक्त करते तो या चित्रपटातील खूप महत्त्वाच्या सीन्सपैकी एक आहे. हा संपूर्ण चित्रपट मुंबईच्या स्पिरीटबाबत भाष्य करतो. चित्रपटाच्या अखेरीस सर्व धर्मीय भारतीयांचं गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जाणारा सीन एकात्मतेची भावना जागृत करणारा आहे. या चित्रपटात सर्व काही ‘सूर्यवंशी’मध्ये पहायला मिळतं. लॅाकडाऊननं आपल्याला हे शिकवलंय की, पुढे चालत रहा. थांबून चालणार नाही. घरी बसून उपयोगाचं नाही. तुम्हाला पुढे पाऊल टाकावंच लागेल. अनेक लोकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे हे खूप दु:खद आहे; बट लाईफ हॅज टू गो आॅन. दॅटस ईट…
मराठी चित्रपटांचा आत्मा त्यांच्या स्क्रीप्टमध्ये असतो असं मला वाटतं. खूप वेगळ्या प्रकारचे चित्रपट मी पहातो. रितेश देशमुख मला वेगवेगळे चित्रपट पहायला सांगत असतो. सर्व वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जे नेहमीच आश्चर्यचकीत करतात. प्रादेषिक चित्रपट असूनही हिंदी सिनेमांपेक्षा मराठी चित्रपट खूप रिस्क घेऊन बनवले जातात असं मला वाटतं. मराठी चित्रपटांवर माझं नितांत फिल्म आहे. नुकताच आमचा ‘चुंबक’ सोनी लिव्हवर रिलीज झाला आहे. आता भविष्यात आणखी एखादा चांगला मराठी चित्रपट आला तर नक्कीच करणार. ‘सूर्यवंशी’नं आपलं काम केलं आहे. आज जर सिनेमागृहं पूर्णपणे ओपन असती तर ‘सूर्यवंशी’च्या बिझनेसचा आकडा ५० ते ६० कोटींनी नक्कीच वाढला असता. आजही काही ठिकाणी नाईट शोज नाहीत. याचं क्रेडीट रोहितला द्यावं लागेल.
मराठी चित्रपट निर्मात्यांना मी इतकंच सांगेन की घाबरायचं कशाला… लाईफ हॅज टू गो आॅन. घाबरायचं काय आहे यात. जे होणार ते होणारच आहे, पण योग्य ती काळजी घ्या. सेफ्टी मेजर्स घेऊन पुढची वाटचाल करा. लॅाकडाऊनमध्ये पोलिस, डॅाक्टर्स, मनपा कर्मचारी आपलं काम करत होते. केवळ आपणच घरात बसून होतो. आता परिस्थिती निवळलेली असल्यानं तुम्हाला पुढं जाणं भागच आहे. ‘सूर्यवंशी’नं प्रेक्षकांना घरातून बाहेर काढून सिनेमागृहांपर्यंत आणण्याचं काम केलं असल्यानं आता सर्वांनी आपापले चित्रपट बेधडकपणे रिलीज करा हेच माझं मराठी निर्मात्यांना सांगणं आहे. मी नेहमीच सकारात्मक विचार करतो. कोणता चांगला चित्रपट करता येईल, काय वेगळं देता येईल हे शोधत असतो. माझा कोणताही चित्रपट दुसऱ्यासारखा नसतो. तसाच सकारात्मक विचार करायला हवा. ‘सूर्यवंशी’नंतर मी ‘पृथ्वीराज’ केला. ‘बच्चन पांडे’ केलाय. प्रत्येकाचा वेगळा जॅानर आहे. कोणतंही कॅरेक्टर एकमेकांशी मॅच होत नाही याची काळजी मी कायम घेतो.