(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा डे आता नव्या आयुष्याची सुरुवात करत लग्नबंधनात अडकली आहे. इशाने गीतकार आणि लेखक अभिषेक खणकरसोबत पारंपरिक पद्धतीने सात वचनं घेत आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतली आहे. तिच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सगळे मराठी कलाकार तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
इशाने दोन दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाआधीच्या विधींचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसले. आता तिच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहते आणि मित्रपरिवार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्री वनिता खरातने इन्स्टाग्रामवर इशा आणि अभिषेकच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नवदांपत्य अतिशय आनंदी आणि उत्साही दिसत आहे. लग्नात इशाने लाल रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसून सुंदर असा महाराष्ट्रीयन लूक तयार केला होता. तिच्या नथीने आणि पारंपरिक दागिन्यांनी सर्वांचे लक्ष देखील वेधून घेतले. तर अभिषेकने मेहेंदी रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान करत पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली होती. एका फोटोमध्ये अभिषेक इशाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत असून तो क्षण खास ठरला आहे.
वनिताने इशाचा आणखी एक फोटो शेअर करत त्याला “नवराई माझी लाडाची” असे कॅप्शन दिले आहे. इशाच्या लग्नामुळे तिच्या मित्रमैत्रिणींमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर इशा आणि अभिषेकच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्यांच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.
गौरव कपूर अडकला विवाहबंधनात! कृतिका कामराशी बांधली लग्नगाठ; गपचूप उरकले लग्न
इशाचा पती अभिषेक खणकर हा मराठी मनोरंजनसृष्टीतील ओळखीचा गीतकार आणि लेखक आहे. त्याने लक्ष्मी निवास आणि खुलता कळी खुलेना या मालिकांची शीर्षकगीते लिहिली आहेत. याशिवाय अनेक मराठी चित्रपटांमधील गाणीही त्याने लिहिली असून त्यासाठी त्याला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
दरम्यान, इशा डेच्या अभिनय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात प्रसिद्ध झाली. याशिवाय तिने ‘अय्या’ आणि ‘गुलकंद’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे ‘गुलकंद’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. नुकतेच तिला ‘झी मराठी चित्र गौरव २०२६’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’चा पुरस्कारही मिळाला आहे. नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या इशा डे आणि अभिषेक खणकर यांना चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा आता मिळत आहेत.






