कुटुंब ही अशी एक पद्धत आहे जिथे एकत्रित राहून अनेक नाती जपली जातात. एकत्र कुटुंब पद्धतीत एकाच छताखाली सर्व प्रेमाने राहतात. यालाच इंग्रजीमध्ये जॉइंट फॅमिली म्हणतात. तर दुसरीकडे दिवसेंदिवस शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी मुले घराबाहेर पडतात. ज्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत कमी होताना दिसत आहेत. तर काही लोक स्वत: च्या आवडीनुसार कुटुंबापासून वेगळे होऊन एकटे राहण्याचा निर्णय घेतात.
सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं तर एका कुटुंबात 20 ते 25 जण एकत्र राहत होते. मात्र आजच्या काळात 2 ते 4 जण पण एकत्र कुटुंबात दिसून येत नाही. जरी 2 ते 4 जण कुटुंबात राहत असले तरी प्रत्येकी कामासाठी मोलकरणी पाहायला मिळते. तर मुलांची काळजी घेण्यासाठी बेबी सिटर आणि घरातील उर्वरित काम करण्यासाठी नोकर ठेवतात. इतकं असूनही घरात समस्या आणि कलह सुरूच असतो. याशिवाय आजकाल नाती लवकर संपवण्याचे प्रमाणही वाढले आहे. पण सुरुवातीच्या काळात एकत्र कुटुंबात राहण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का?
आजकाल जरी वेगळे राहण्याची क्रेझ वाढत असली तरी एकत्र कुटुंबात राहण्याचे अनेक फायदे आहेत. एकत्र कुटुंबासोबत राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना एकटा करावा लागत नाही. कोणत्याही लहान मोठ्या अडचणीच्यावेळी कुटुंबातील लोक बरोबर असतात आणि लवकरात लवकर समस्या सोडवता येतात.
कुटुंबातील सदस्यांकडून योग्य सल्ले
पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबात इतके सदस्य असायचे की, कुटुंबातील लग्न झालेल्या जोडप्यामध्ये भांडण झाले किंवा भावंडं आपसात भांडले तर घरातील वडीलधारी मंडळी मतभेद मिटवायचे. त्याचबरोबर योग्य तो सल्ला देखील देयाचे. मात्र आजच्या युगात असे वाद झाले तर घर सोडण्याचा पहिला निर्णय घेतात. तसेच आयुष्यातील महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी अनुभवी माणसांच्या सल्ल्याची गरज असते. अशात मुलांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी कुटुंबातील अनुभवी व्यक्तींच्या सल्ले कामी येतात.
घटस्फोटाचे प्रमाण कमी होते
जर तुम्ही कधी तुमच्या आई-वडिलांकडून किंवा नातेवाईकांकडून त्यांच्या काळाबद्दल ऐकले असेल, घटस्फोटाचा उल्लेख कधीच ऐकला नसेल. कारण त्यांच्या काळात घटस्फोट असे काही नव्हते, एकदा लग्न झाले की शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवायचं. पती-पत्नीमध्ये कितीही भांडण झाले तरी त्यांनी एकमेकांना घटस्फोट देत नव्हते. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की, एखादी छोटीशी भांडणे झाली की ती सोडवण्याऐवजी वादाची ठिणगी पेटते आणि मग प्रकरण घटस्फोटावर येते. कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ आणि बळजबरी प्रकरणी आवाज उठवणे आणि घटस्फोट देणे योग्य आहे, परंतु निराधार कारणांसाठी नाते संपवणे चुकीचे आहे.
कुटुंबांचा पाठिंबा
आज जिथे हवं ते खाऊ न देणे, सहलीला न पाठवणे अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलांसोबत भांडणे सुरू होतात. पूर्वीच्या काळी असे होत नव्हते. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही संयम आणि प्रेम होते. पूर्वीचे लोक लहानसहान गोष्टीवर रागावून बसत नव्हते. उलट अशा गोष्टी विसरून नाती घट्ट करण्याचा प्रयत्न करत असत, पण आजच्या लोकांमध्ये संयमाची फार कमतरता आहे.
हक्काचे स्वत:चे घर असावे, गाडी असावी, मुलांनी खासगी शाळेत शिकावे आणि आपण देश-विदेशात फिरावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कुटुंबाचा पाठिंबा असेल तर या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.