नवी दिल्ली : पाकिस्तानातील पेशावरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून इमाम बारगाहमध्ये (मशीद) शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान दौरा मध्यंतरी सोडून देईल, अशी अटकळ कायम आहे. पण आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.
पेशावर येथील मशिदीत आत्मघाती बॉम्बस्फोट होऊनही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आपला पाकिस्तान दौरा सुरू ठेवणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तानात आला असून पेशावरपासून १८४ किमी अंतरावर असलेल्या रावळपिंडी येथे पहिली कसोटी खेळत आहे. बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, “क्रिकेट ऑस्ट्रेलिया पीसीबी, त्यांचे उच्चायुक्त आणि संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. या ऐतिहासिक दौऱ्याला कोणताही धोका नाही.
ते म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियन संघाला दौऱ्याच्या प्रत्येक टप्प्यावर उच्चस्तरीय सुरक्षा दिली जाईल.’ ऑस्ट्रेलियन मीडियाने असेही म्हटले आहे की, संघाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि ते परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना वैद्यकीय मदत दिली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांनी सांगितले की, या भागात अनेक बाजारपेठा असून शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी येथे गर्दी असते.
पेशावरच्या सीसीपीओनुसार, कोचा रिसालदार येथे इमामबाद येथे पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालावरून असे दिसते की हल्लेखोरांनी दोन पोलिस रक्षकांना गोळ्या घातल्या आणि लवकरच स्फोटकांसह आवारात प्रवेश केला. हा बहुधा इमामबाड्यातील आत्मघातकी हल्ला असावा.






