फोटो सौजन्य सोशल मिडिया
ज्येष्ठ व्यक्तींमध्ये किरकोळ पडल्यानंतर पाठदुखी दीर्घकाळ कायम राहते. त्यामागे मणक्याच्या हाडाला झालेले व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर असण्याची शक्यता असते. विशेषतः ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडे कमजोर होतात. तर हाडे कमजोर असल्यास धोका देखील अधिक असतो.
पुढील तपासण्या आणि इमेजिंगनंतर रुग्णाच्या L2 मणक्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसमुळे झालेला व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर (OVCF) असल्याचे आढळून आले आहेत. मणक्याची हाडे कमजोर झाल्यामुळे ती दबली गेली किंवा त्यांची उंची कमी झाली की व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर होऊ शकते. या मध्ये ऑस्टिओपोरोसिस हे यामागील सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. निरोगी मणक्याला इजा न पोहोचवणाऱ्या तुलनेने किरकोळ दुखापतीनंतरही अशी फ्रॅक्चर होऊ शकतात. रुग्णाची तपासणी किम्स हॉस्पिटल्स मध्ये झाली. ठाणे येथील कन्सल्टंट स्पाइन सर्जरी तज्ज्ञ डॉ. अमोघ झावर यांनी केली. त्यांनी फ्रॅक्चर झालेल्या मणक्याला स्थिरता देण्यासाठी मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे.
रुग्णावर बलून किफोप्लास्टी (Balloon Kyphoplasty) ही आधुनिक स्पाइन सर्जरी करण्यात आली. या तंत्राचा उद्देश फ्रॅक्चर झालेल्या मणक्याला स्थिरता देण्यासोबतच कमी झालेली मणक्याची काही उंची पुन्हा मिळवण्यास मदत करणे हा आहे. या प्रक्रियेदरम्यान त्वचेवरून एक छोटासा मार्ग तयार करून फ्रॅक्चर झालेल्या मणक्यामध्ये विशेष प्रकारचा बलून घातला जातो. हा बलून काळजीपूर्वक फुगवून जागा तयार केली जाते आणि मणक्याचा आकार पूर्ववत करण्यास मदत केली जाते. आवश्यक सुधारणा झाल्यानंतर बलून काढला जातो आणि मणक्याला स्थिरता देण्यासाठी वैद्यकीय बोन सिमेंट भरले जाते.
संपूर्ण प्रक्रिया स्थानिक भूल देऊन सुमारे ३० मिनिटांत पूर्ण करण्यात आली. सुईच्या आकाराच्या छोट्या प्रवेशमार्गातून ही प्रक्रिया करण्यात आली आणि टाके घालण्याची गरज भासली नाही. रुग्णाला त्याच दिवशी घरी जाता आले. या प्रकरणाबाबत माहिती देताना किम्स हॉस्पिटल्स ठाणे येथील कन्सल्टंट स्पाइन सर्जरी तज्ज्ञ डॉ. अमोघ झावर म्हणाले, “ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे मणक्याचे फ्रॅक्चर अनेकदा दुर्लक्षित राहू शकते, विशेषतः जेव्हा ते किरकोळ वाटणाऱ्या पडण्याच्या घटनेनंतर झालेले असते.
ज्येष्ठ व्यक्तीला सतत पाठदुखी होत असल्यास, ती केवळ वयामुळे होणारी सामान्य वेदना म्हणून दुर्लक्षित करू नये. या रुग्णाच्या बाबतीत इमेजिंगच्या मदतीने मणक्याचे फ्रॅक्चर ओळखता आले आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने वेदनांचे मूळ कारण दूर करता आले.”
“बलून किफोप्लास्टीमुळे फ्रॅक्चर झालेल्या मणक्याला यांत्रिक स्थिरता मिळते आणि मणक्याची उंची पूर्ववत करण्यास मदत होऊ शकते. अतिशय छोट्या प्रवेशमार्गातून ही प्रक्रिया केली जात असल्याने योग्य प्रकारे निवडलेल्या रुग्णांना कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण होणे आणि लवकर हालचाल सुरू करता येणे याचा फायदा होऊ शकतो. मात्र, या प्रक्रियेमुळे फ्रॅक्चरवर उपचार होतो; भविष्यात पुन्हा फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी करण्यासाठी मूळ ऑस्टिओपोरोसिसवरही उपचार करणे आवश्यक आहे.”
या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. हाडांची ताकद वाढवण्यासाठी आणि भविष्यातील फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी ऑस्टिओपोरोसिसवरील वैद्यकीय उपचारही सुरू ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, फ्रॅक्चर होईपर्यंत ऑस्टिओपोरोसिसची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे हा आजार अनेकदा लक्षात येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींमध्ये किरकोळ पडल्यानंतर अचानक किंवा सतत पाठदुखी, शरीराच्या ठेवणीत किंवा उंचीत बदल किंवा हालचाल करताना अडचणी येतात. या अडचणी जाणवत असल्यास वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.
या प्रकरणातून ज्येष्ठ रुग्णांमध्ये मणक्याच्या फ्रॅक्चरकडे केवळ वेदना कमी करण्याच्या दृष्टीने न पाहता त्यामागील कारणावरही उपचार करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. खराब झालेल्या मणक्याला स्थिरता देऊन तातडीची समस्या दूर करता येते, तर ऑस्टिओपोरोसिसवर योग्य उपचार करणे हे दीर्घकाळ मणका आणि शरीरातील इतर हाडांचे संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक आहे.






